पणजीत ११ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावणारी आणि सामाजिक सलोखा बिघडवणारी घोषणाबाजी केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी ३०० अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आणि मतदार यादीतील त्रुटींवर प्रकाश टाकण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान काही तरुण मुलींनी 'हिंदुत्व मुर्दाबाद'सारख्या घोषणा दिल्या. या दिलेल्या घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
एकंदरीत घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केले होती. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारलेली असतानाही हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १९६ आणि २९९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी या घटनेची गंभीर दखल घेत गोव्यातील धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. पोलिसांकडून सध्या व्हिडिओ फुटेजची तपासणी सुरू असून आंदोलकांची ओळख पटवण्याचे काम वेगाने चालू आहे.
घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीजेपी-गोवाने गुरुवारी यावर आपले अधिकृत स्पष्टीकरण जारी केले होते. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणारी, किंवा कोणाचाही अनादर करणारी वक्तव्ये, घोषणा आणि कृत्यांचे पक्ष कधीही समर्थन करत नाही, असे सीजेपीने इन्स्टाग्रामवरील आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना सीजेपीने म्हटले आहे की, पक्ष सर्व धर्म, जाती आणि समुदायांचा मनापासून आदर करतो. ११ ऑक्टोबर रोजी जमलेला जनसमुदाय हा केवळ निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी होता. निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास पुनस्थापित करणे हाच पक्षाचा मुख्य उद्देश असून आमचे मुद्दे संस्थात्मक आणि लोकशाहीवादी आहेत, धार्मिक किंवा जातीय नाहीत. नागरिकांनी या लोकशाही लढ्याला कोणत्याही धार्मिक वादाशी जोडू नये, असे आवाहन करत सीजेपी संवैधानिक मूल्ये आणि निवडणूक नैतिकतेसाठी वचनबद्ध असल्याचे पक्षाने नमूद केले आहे.


