ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराबाहेर भरधाव ट्रकने ४५ भाविकांना चिरडले; १५ ठार, ३० जखमी

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील शीतला माता मंदिराजवळ शनिवारी मध्यरात्री अनियंत्रित भरधाव ट्रकने दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना चिरडल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराबाहेर भरधाव ट्रकने ४५ भाविकांना चिरडले; १५ ठार, ३० जखमी

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नवरात्रोत्सवाच्या धार्मिक उत्साहावर दुःखाचे सावट पसरवणारी अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. चिनोर रस्त्यावरील प्रसिद्ध शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या आणि दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या अंगावरून एक अनियंत्रित भरधाव ट्रक गेला. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात मृतांची संख्या १५ वर पोहोचली असून, दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर परिसरात प्रचंड पळापळ आणि घबराट पसरली.



मिळालेल्या माहितीनुसार, छिनोर बाजूकडून येणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्यावर धान्याने भरलेल्या एका प्रचंड ओव्हरलोड ट्रकने अचानक नियंत्रण गमावले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या प्रतिबंधित मार्गावर पोलिसांनी लावलेले स्टॉपर्स आणि बॅरिकेट्स तोडत हा ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने आणि दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना फरफटत घेऊन गेला. शेवटी हा ट्रक अत्यंत वेगाने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि बाहेरील भिंतीवर जाऊन आदळला. ही धडक इतकी प्रचंड होती की मंदिराची एक भिंत कोसळली आणि सुमारे ४० ते ५० भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले.


घटना घडताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान आणि एसएसपी धर्मवीर सिंह यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका आणि मदत पथके पाचारण केली. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे ५ ते ६ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक आलेल्या या ओव्हरलोड ट्रकने भाविकांना सावरण्याची संधीही दिली नाही. अनेक लोक जागीच तडफडताना दिसले. नवरात्रीच्या काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशास पूर्णपणे बंदी असताना आणि पोलीस चौकी तैनात असतानाही हा ट्रक या रस्त्यावर कसा शिरला, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वाहनाचे स्टेअरिंग फेल झाले होते की चालकाचे नियंत्रण सुटले होते, याचा तपास आरटीओ आणि पोलिसांचे विशेष पथक करत आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.



हेही वाचा
सर्व पहा