पोक्सो प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; महिला उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला यश

अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्याच्या गंभीर प्रकरणात गोवा बाल न्यायालयाने दोषीला जन्मठेप व दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
पोक्सो प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; महिला उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला यश

पणजी: अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एकाला पणजी येथील गोवा राज्य बाल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, त्याला दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास करणाऱ्या कोलवा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासकार्याला या निकालामुळे मोठे यश मिळाले.

मे २०१९ मध्ये हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले होते. अल्पवयीन मुलीवर वारंवार झालेल्या अत्याचारांमुळे ती गर्भवती राहिल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सपना गावस यांनी हाती घेतला होता. कोलवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण करण्यात आला. न्यायालयात या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू साक्ष व पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील ॲड. नार्वेकर यांनी मजबूतपणे मांडली.

बाल न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून आरोपीला दोषी ठरवले आणि जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडित अल्पवयीन मुलीला आणि तिच्या परिवाराला न्याय मिळण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. तपास अधिकारी सपना गावस, त्यांचे मार्गदर्शक पोलीस निरीक्षक राहुल परब आणि सरकारी वकील तेमा नार्वेकर यांच्यासमन्वयामुळे या खटल्यात न्यायदान प्रक्रिया यशस्वी ठरली असून, कायदेशीर क्षेत्रातून या निकालाचे स्वागत होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा