पणजी: गोव्याच्या राजकीय पटलावर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षात अंतर्गत आरोपांच्या फैरी झडत आहेत. गोव्यात एका नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेमागे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अमित पालेकर यांनी केला आहे.
सासष्टी आणि इतर भागात काँग्रेस पक्षाची मते फोडण्याच्या उद्देशाने भाजपकडून या नव्या राजकीय पक्षाला मोठे आर्थिक पाठबळ दिले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेस पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या 'गोवा राखण यात्रे'दरम्यान कुडचडे येथे अमित पाटकर गैरहजर राहिल्याने पालेकर यांनी त्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. पाटकर यांनी या सर्व प्रकरणाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
अमित पालेकर यांनी या संदर्भात काँग्रेसची भूमिका मांडताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाकडून तब्बल १०० कोटींची गुंतवणूक करून विरोधकांची मते विभागण्यासाठी एक नवीन पक्ष स्थापन करण्याचा कट रचला जात आहे. या नियोजित पक्षाचे नाव 'गोवा काँग्रेस' ठेवण्यासाठी अर्ज करण्यात आला असून, यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाची ओळख आणि नाव वापरून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. 'गोवा राखण यात्रे'ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपने धास्ती घेतली आहे, म्हणूनच काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी हा डाव आखला जात असल्याचा आरोप पालेकर यांनी केला.
दरम्यान थिवीचे झेडपी सदस्य निलेश कांबळे आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत 'गोवा काँग्रेस'च्या मुद्द्यावर झालेल्या मीटिंगमध्ये काही नावे समोर आली होती, ज्यामध्ये अमित पाटकरांचे नाव समोर आले होते. हे प्रकरण दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या कानावर देखील घालण्यात आल्याचे पालेकर यांनी सांगितले. स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवून घेणारे तसेच राजकारणात वावरणारे काहीजण यामागे सक्रिय आहेत. पक्षाचा माजी अध्यक्ष असताना अशा प्रकारच्या हालचाली करतो ? हे चुकीचे आहे. पक्षासोबत राहून जर कोणी विरोधात काम करत असेल तर ते योग्य नाही, आणि नेतृत्वाविषयी काही शंका असल्यास अध्यक्षांसोबत चर्चा करून स्पष्टता करून घेतली पाहिजे, असे पालेकर म्हणाले.
तसेच उत्तर गोवा आणि तिसवाडी परिसरातील काही आमदारांसोबत आणि स्वयंघोषित राजकीय विश्लेषकांसोबत यासंदर्भात गुप्त बैठका झाल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षासोबत राहून पक्षाविरोधात काम करणे अयोग्य असून, जनतेचा कल हा भाजपच्या कारभाराला कंटाळून बदलाच्या बाजूने असल्याचे पालेकर म्हणाले.
दुसऱ्या बाजूला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आग्नेलो फर्नांडिस यांनीही अमित पाटकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत पालेकर यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे. फर्नांडिस यांनी स्पष्ट केले की, अमित पाटकर प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकदा पाटकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु पाटकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. गेल्या साडेचार वर्षांपासून आपल्याला आणि पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना विनाकारण ताटकळत ठेवण्यात आले आणि कोणत्याही निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले गेले नाही.
फर्नांडिस यांनी एका धक्कादायक घडामोडीचा खुलासा करताना सांगितले की, जेव्हा अमित पाटकर यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले, तेव्हा ते स्वतःहून त्यांच्याकडे आले होते. पाटकर यांनी स्थापन केलेल्या 'गोवा काँग्रेस पक्ष' या नव्या राजकीय पक्षात सहभागी होण्याचा प्रस्ताव त्यांनी फर्नांडिस यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, फर्नांडिस यांनी हा प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावला. "मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. जेव्हा मी पक्षात सक्रीय होतो, तेव्हा तुम्ही मला कोणतीही जागा दिली नाही, मग आता तुमच्या या नवीन पक्षात येऊन मी काय करू?" अशा कडक शब्दांत त्यांनी पाटकरांना सुनावले होते.
आपल्या राजकीय निष्ठेविषयी बोलताना आग्नेलो फर्नांडिस म्हणाले की, मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या विचारांच्या एका व्यक्तीला तिकीट दिल्याने त्यांनी तृणमूल काँग्रेसला (TMC) पाठिंबा दिला होता, तरीही त्यांनी अधिकृतपणे कोणताही दुसरा पक्ष स्वीकारला नाही. आपली विचारसरणी आणि निष्ठा कायम काँग्रेस पक्षाशीच राहिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाने काँग्रेसच्या विचारसरणीशी प्रामाणिक असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट दिले तर त्याला पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला जाईल. परंतु, पुन्हा एकदा भाजपकधून आलेल्या किंवा भविष्यात पक्ष बदलू शकणाऱ्या संभाव्य नेत्याला तिकीट दिले गेले, तर आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी पक्षाला दिला आहे.
या सर्व घडामोडींमुळे आणि काँग्रेसच्याच दोन प्रमुख नेत्यांनी अमित पाटकर यांच्यावर थेट नाव घेऊन केलेल्या आरोपांमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आरोपांवर आता अमित पाटकर अथवा भाजपकडून काय अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


