वाळपई : पाली ते जांभळीकडे रस्त्यावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ६० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजेंद्र दत्तराज चव्हाण (वय ६०) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील रहिवासी होते आणि सध्या भिरोंडा पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या अंसोले येथे राहत होते. या अपघातानंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून घाटातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजेंद्र चव्हाण हे शनिवारी सायंकाळी आपल्या ऑल्टो ८०० कारमधून बेळगाव ते पाली असा प्रवास करत होते. पाली ते जांभळीकडे मार्गावरील उतारावरून जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे ही कार रस्त्यावरून दोन ते तीन वेळा पलटी झाली. यात चव्हाण कारखाली अडकले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने त्यांना अपघातग्रस्त वाहनामधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने आपत्कालीन मदतीसाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधण्यात आला. मात्र, अपघाताच्या ठिकाणापर्यंत रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे, त्यांना केरी मार्गे साखळी आरोग्य केंद्राकडे हलवण्यात आले. परंतु, रुग्णवाहिका केरीत पोहोचत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.


