गाव

सौंदर्याने नटलेला, नदीपलीकडचा माझा गाव 'उसगाव'. कौलारू घरे, कुळागर, काजूचे डोंगर अन् आपुलकी जपणाऱ्या माणसांचा गाव! पण काळ बदलला, निसर्ग संपला, इमारती उभ्या राहिल्या अन् लहानपणीचे ते सुंदर गावपण हरवून गेले.

Story: ललित |
31st July, 10:23 pm
गाव

​आभाळातील पाण्याच्या मोत्यांची किंमत कोणाला नसते, पण सागरातील मोत्यांची किंमत सर्वांना असते; म्हणूनच आभाळातील मोत्यांचे थेंब वाहून जातात आणि समुद्रातील मोती गळ्यात सजतात. तसेच झाडांची, गावांची, शेतांची, संस्कृतीची, ग्रामीण बोलीभाषेची, निसर्गाची व गावात राहणाऱ्या लोकांची किंमत कोणालाच नसते. कारण शेतकरी कष्टाळू असतात. त्यांच्याकडे शहरांसारखी घरे नसतात, काही सुविधाही नसतात; पण तरीही ते तिथे कष्ट करून सुखी असतात. शहरातील माणसांना सगळ्या सुविधा असूनही ते पैशांच्या मागे रडत-मरत धावत असतात. कोणाला काम नाही म्हणून रडतात, तर कोणाला धोका मिळाला म्हणून रडतात. सुख म्हणजे काय, तेच त्यांना माहीत नसते; जे गावाच्या स्वच्छ परिसरात आणि वातावरणात मिळते. गावातील गावरान/गावाकडच्या लोकांच्या स्वभावात आणि त्यांच्या आपुलकीपणात मिळते ते सुख. त्यामुळे शहरापेक्षा जास्त किमतीचे सुख फक्त गावातच मिळते. त्या रानवटी वाटांवर खेळणाऱ्या मुलांना, तर शेतात राबणाऱ्या लोकांना, पैसे नसूनही त्यांच्या मदतीची साथ आणि हात सर्वांसाठी असतो.

असे गावातील राहणीमान असलेल्या गावात अनेक जातींचे, धर्मांचे लोक राहतात. पण पूर्वी एका गावात किंवा एखाद्या गावातील वाड्यामध्ये सुद्धा एकाच जातीचे किंवा समाजाचे लोक राहायचे.

गावाचे वर्णन करताना 'बोरकरांच्या' कवितेत ते म्हणतात की,

"निळ्या खाडीच्या काठाला

माझा हिरवाच गाव

जगात मी मिरवितो

त्याचे लावुनिया नाव

पूल ओलांडिता पुढे

रस्ता येईल तांबडा

घरी आणील सरळ

जरी दिसला वाकडा"

त्याचप्रमाणे, नदीपलीकडे असलेला सौंदर्याने भरलेला असा छोटासा माझा गाव 'उसगाव'. गावातील परिसर म्हटला की डोंगराच्या रांगा, गावातील समाज, रूढी, परंपरा, संस्कृती, कोकणी बोलीभाषा, वातावरण इत्यादी गोष्टी डोळ्यांसमोर येतात. गावातील कौलारू घरे, जी माडाची 'चुरटं' आणि 'करड' म्हणजेच एका प्रकारचे मोठे उगवणारे गवत वापरून बांधलेली असायची; त्यात मग मातीच्या भिंती आणि थंडगार वातावरण असलेली घरे. घरात शेणाने सारवलेली जमीन, घरासमोर शेणाने सारवलेले अंगण. अंगणाच्या भोवती असलेली रंगीबेरंगी फुलांची सुगंधमय झाडे आणि घराभोवती असलेले कुंपण. कुंपणाच्या आत गाईचा गोठा, घराच्या मागे केळीची झाडे, स्वयंपाकघरातील खिडकीबाहेर असलेले शेवग्याचे झाड. घराच्या मागे लहानशी बाग, ज्यामध्ये भाज्या, मिरच्या, औषधी झाडे अशा अनेक प्रकारची झाडे उगवायची. आजूबाजूला माड-पोफळींनी भरलेले कुळागर, हिरवीगार शेती, काजूच्या झाडांचे डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेले तीन लहानसे झरे आणि माझा छोटासा बारा वाड्यांचा गाव! या सुंदरशा वातावरणात राहणारे गावातील लोक, त्यांची संस्कृती, भाषा, रूढी-परंपरा, व्यवसाय आणि कृषीप्रधानता गावात दिसून येते.

गाव म्हणजे केवळ शेती नव्हे; तर बोलीभाषेतील गोडवा, म्हणी, गाणी, देवदेवता आणि एकत्र साजरे होणारे धालो, कालो, शिवरात्री व चतुर्थीच्या फुगडीसारखे उत्सव असतात. माझ्या आजीच्या काळातील गाव म्हणजे एक स्वर्गच होता. मातीची-कौलारू घरे आणि १५-२० माणसांची एकत्र कुटुंबे असायची. दिवसभर शेतात कष्ट करून, अडचणीतही आनंदाने जगणारी आणि एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी ती माणसे होती. थोडक्यात, गाव म्हणजे माणसांची माणुसकी आणि एकत्र जपलेला आठवणींचा समृद्ध ठेवा होता.

काळ बदलला तसे गावात अनेक बदल घडले. १९५० पर्यंत पोर्तुगीज सत्तेत शेतातील धान्य आणि बागेतील फळांचा अर्धा हिस्सा त्यांना द्यावा लागे. पोर्तुगीज सत्ता संपल्यानंतर एकत्र कुटुंबे विभक्त झाली, जमिनीचे वाटे झाले अन् पैशांच्या हावेपोटी भावा-भावांत भांडणे व जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू झाले. तरीही नंतरच्या काळात लोकांनी भाताऐवजी भाजीपाला, मिरच्या आणि काजू-माडाची लागवड सुरू ठेवली. काजूचा रस व 'निरो' विकणे हेच पुढे गावातील लोकांच्या उपजीविकेचे आणि कमाईचे मुख्य माध्यम बनले.

हळूहळू राजकारण आले, एकमेकांच्या जमिनी चोरू लागले. न शिकलेले लोक राजकारण चालवू लागले. हळूहळू गाव विकला गेला, कारखाने झाले. बाहेरील प्रदेशातील माणसे गावात येऊन राहू लागली. कोणाच्याही जागेवर साड्यांची किंवा ताडपत्रीची घरे बांधू लागली. हळूहळू त्यांनी त्यांचे व्यवसाय सुरू केले आणि गावातील लोकांचे व्यवसाय बंद पडले. कामासाठी लोकांना धडपडावे लागले. पंचायतीतील राजकारणी लोकांना पैसे देऊन बाहेरील लोकांनी गावातील जागा आपली करून घेतली. गावातील लोकांना खाणींमध्ये काम करावे लागले, लोकांची शेती पडीक राहिली. गाव विकून शहरे झाली; पण ज्या लोकांच्या जमिनी विकल्या गेल्या, त्यांना आपली जमीन विकली गेली आहे याचा पत्तासुद्धा लागला नाही! जेव्हा कळले, तेव्हा खूप उशीर झाला होता.

गावातील निसर्ग संपला. थोडक्यात सांगायचे तर निसर्गपूर्ण, निसर्गाने नटलेले डोंगर, मंद वाहणारे झरे आणि नदीकाठी वसलेला असा माझा सुंदर गाव; ज्याचे काळानुरूप सौंदर्यच हरवले, गावपण संपले. ज्या जागी घनदाट जंगल होते, त्या जागी घरांच्या आणि इमारतींच्या राशी झाल्या. गावातील माणसांपेक्षा भारतातील इतर प्रदेशातील माणसांनी भरलेले ते एक शहर वाटू लागले. जो गाव, जे सौंदर्य आम्ही आमच्या लहानपणी पाहिले होते, ते सर्व नाहीसे झाले...



- सिया गावडे
गोवा विद्यापीठ, ९६३७२८४७०१