“पाऊस पडला की गुडघे दुखतात’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण हे केवळ हवामानामुळे होते की त्यामागे शरीरातील इतर बदलही कारणीभूत असतात?”
पावसाळा सुरू झाला की अनेक महिला “गुडघे जास्त दुखू लागले”, “पायात कडकपणा जाणवतो”, “जुनी पाठदुखी पुन्हा वाढली” अशा तक्रारी घेऊन डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टकडे येतात. अनेकांच्या मनात असा समज असतो की पाऊस पडला की सांधे झिजतात किंवा हवामानामुळेच सांधेदुखी वाढते. पण यात किती तथ्य आहे? चला, यामागील विज्ञान आणि काही सामान्य समज-गैरसमज समजून घेऊया.
सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की पावसाळा हा सांधेदुखीचे थेट कारण नसतो. मात्र वातावरणातील आर्द्रता वाढणे, हवेचा दाब (अॅट्मोस्फेरीक प्रेशर) कमी होणे, थंड वातावरण, कमी शारीरिक हालचाल आणि आधीपासून असलेला संधिवात किंवा सांध्यांचा आजार यामुळे वेदना अधिक जाणवू शकतात.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण अधिक का दिसते?
संशोधनानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये गुडघेदुखी, संधिवात (अर्थ्रायटीस) आणि सांध्यांच्या झिजेची समस्या अधिक प्रमाणात आढळते. यामागे अनेक कारणे आहेत. -महिलांमध्ये स्नायूंचे प्रमाण तुलनेने कमी असते, त्यामुळे सांध्यांना मिळणारा आधारही कमी असू शकतो.
-गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान शरीरात होणारे बदल, रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन या हार्मोनचे प्रमाण घटणे, तसेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची कमतरता यांचा हाडे व सांध्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय घरातील आणि नोकरीतील दुहेरी जबाबदाऱ्या, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि नियमित व्यायामासाठी कमी वेळ मिळणे हीदेखील महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हवामानातील बदलांमुळे आधीपासून असलेली सांधेदुखी महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक तीव्रतेने जाणवू शकते.
यासंदर्भात काही सामान्य समज आणि त्यामागील सत्य जाणून घेऊया.
समज : पाऊस पडला की सांधे झिजतात.
सत्य : पावसामुळे सांधे झिजत नाहीत. सांध्यांची झीज ही वय, वजन, दुखापत, आनुवंशिकता आणि जीवनशैली यांसारख्या कारणांमुळे होते. पावसाळ्यात हवामानातील बदलांमुळे वेदनांची तीव्रता वाढल्यासारखी वाटू शकते.
समज : सांधे दुखत असतील तर पूर्ण विश्रांती घ्यावी.
सत्य : दिवसभर विश्रांती घेतल्याने स्नायू आणखी कमकुवत होतात आणि सांध्यांचा कडकपणा वाढतो. योग्य प्रमाणात चालणे, स्ट्रेचिंग आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे अधिक फायदेशीर ठरते.
समज : फक्त वृद्ध महिलांनाच सांधेदुखी होते.
सत्य : आजकाल कमी वयातील महिलांमध्येही ही समस्या दिसते. चुकीची बसण्याची पद्धत, लठ्ठपणा, कमी व्यायाम, व्हिटॅमिन D ची कमतरता, थायरॉईडचे विकार किंवा ऑटोइम्यून आजार यामुळेही सांधेदुखी होऊ शकते.
समज : वेदनाशामक गोळ्या घेतल्या की उपचार पूर्ण झाले.
सत्य : वेदनाशामक औषधे तात्पुरता आराम देतात; पण मूळ कारण शोधून त्यावर उपचार करणे आवश्यक असते. अनेक वेळा फिजिओथेरपी, स्नायू बळकट करणारे व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल यामुळे दीर्घकालीन फायदा होतो.
पावसाळ्यात महिलांनी काही साध्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा. गुडघे, कंबर आणि घोट्यांसाठी नियमित स्ट्रेचिंग करावे. ओले कपडे किंवा पाय जास्त वेळ तसेच ठेवू नयेत. शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा. सूर्यप्रकाश कमी मिळत असल्यामुळे व्हिटॅमिन D ची कमतरता होऊ शकते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून आवश्यक असल्यास पूरक औषधे घ्यावीत. आहारात दूध, दही, नाचणी, तीळ, कडधान्ये, अंडी, मासे आणि पुरेसे प्रथिने यांचा समावेश करावा. वजन नियंत्रणात ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जर सांधेदुखीबरोबर सांध्यामध्ये सूज, लालसरपणा, ताप, सकाळी एक तासापेक्षा जास्त कडकपणा, चालताना तीव्र त्रास किंवा वेदना सतत वाढत असतील तर स्वतः औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान झाल्यास संधिवात किंवा इतर आजारांवर योग्य उपचार करता येतात.
पावसाळ्यात सांधेदुखी वाढल्याची भावना खरी असू शकते, पण त्यासाठी केवळ हवामानाला दोष देणे योग्य नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम, स्नायूंची ताकद वाढवणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि आवश्यकतेनुसार फिजिओथेरपी घेणे या उपायांनी सांध्यांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राखता येते.
- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर


