अन्नाचे पोषणात रूपांतर करणारा 'अग्नि’

शरीराला पोषक घटक का मिळत नाहीत? कारण फक्त अन्नाची गुणवत्ता नसून पचनक्षमता महत्त्वाची आहे. आयुर्वेद सांगतो, सर्व रोगांचे मूळ मंद झालेला 'अग्नि' आहे. खरी पोषणाची सुरुवात ताटातून नाही, तर अग्निपासून होते.

Story: विशेष |
31st July, 09:35 pm
अन्नाचे पोषणात रूपांतर करणारा 'अग्नि’

मा​गच्या वेळी आपण एक शंका मनात घेऊन उत्तर शोधत होतो.

शरीराला पोषक घटक मिळत नाहीत, याचं कारण फक्त अन्नाची गुणवत्ता किंवा जीवनसत्त्वांची कमतरता एवढंच आहे का?

उत्तर आहे – नाही.

कारण आपण जे खातो, ते शरीरासाठी उपयोगी ठरण्यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया घडावी लागते. ती म्हणजे पचन आणि रूपांतरण.

समजा, तुमच्याकडे उत्तम दर्जाचं इंधन आहे. पण इंजिनच व्यवस्थित काम करत नसेल, तर गाडी किती दूर जाईल?

अगदी तसंच आपल्या शरीराचं आहे.

आपण किती खातो, हे महत्त्वाचं आहेच; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे शरीर त्या अन्नाचं काय करतं?

आज आधुनिक संशोधन "Gut Health", "Metabolism", "Nutrient Absorption" यावर भर देत आहे. कारण शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोषण पोहोचण्याचा मार्ग पोटातूनच जातो.

आणि इथेच आयुर्वेद हजारो वर्षांपूर्वी एक विलक्षण गोष्ट सांगतो...

"रोगाः सर्वेऽपि मन्देऽग्नौ."

म्हणजेच, शरीरातील बहुतांश विकारांची सुरुवात मंद झालेल्या अग्नीपासून होते.

इथे अग्नि म्हणजे फक्त पोटातील आग नव्हे. हा अग्नि म्हणजे शरीराची ती अद्भुत क्षमता जी अन्नाचं पोषणात रूपांतर करते, प्रत्येक घासाचं शरीरासाठी ऊर्जा, ताकद आणि ओजामध्ये परिवर्तन करते.

अग्नि सक्षम असेल तर साधा आहारसुद्धा शरीराला चांगला लाभ देतो.

पण अग्नि मंद असेल तर अगदी पौष्टिक अन्नही शरीराला पूर्णपणे उपयोगी पडत नाही.

म्हणूनच काही लोक एकच अन्न खातात; तरी एकजण उत्साही, तर दुसरा कायम थकलेला असतो.

फरक अन्नात नसतो...

फरक अग्नीत असतो.

म्हणून आयुर्वेदात केवळ "काय खावे?" एवढाच विचार नाही; तर "ते कधी खावे, किती खावे, कोणत्या अवस्थेत खावे आणि ते पचवण्याची क्षमता किती आहे?" यालाही तितकेच महत्त्व दिले आहे.

कारण शरीराला पोषण देण्याची खरी सुरुवात ताटातून नाही...

ती अग्निपासून होते.


- डॉ. मीनल जोशी
उपसंचालक, आयुष विभाग, 
गोवा सरकार