खडीने काठोकाठ भरलेला व कोणतेही आच्छादान नसलेला दहा चाकी ट्रक.
गोवन वार्ता प्रतिनिधी
वास्को : चिकोळणा-बोगमाळो येथून मोठी खडी वाहून नेणारी बहुतेक अवजड वाहने खडी वाहतूक करताना हौदावर ताडपत्री किंवा तत्सम कपड्याचे आच्छादान घालत नाहीत. त्यामुळे हौदातील खडी इतर वाहनांवर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी वाहतूक पोलीस, वाहतूक विभागाचे अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने संबंधित वाहनचालक बिनदिक्कतपणे वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारे खडी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
चिकोळणा-बोगमाळो पंचायतीच्या चिकोळणा येथील रस्त्याकडेला असलेल्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात खडीचे ढिगारे रचण्यात आले आहेत. सदर खडीची वाहतूक दहा चाकी ट्रकांतून केली जाते. सदर खडी बाहेरून आणून त्या मोकळ्या जागेवर साठविली जाते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी नेण्यासाठी त्या मोठ्या ट्रकांतून खडीची वाहतूक करण्यात येते. खडीची वाहतूक करताना मोठी खबरदारी घेण्याची गरज असते. या दहा चाकी ट्रकांचा हौद खडीने काठोकाठ भरल्यावरही त्यामध्ये आणखी खडी भरली जाते. सदर खडी हौदामध्ये भरण्यात आल्यावर हौद ताडपत्री व तत्सम कपड्याचे आच्छादान घालण्याची गरज आहे. या वाहतूक नियमांकडे पद्धतीशीरपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दहा चाकी ट्रकांच्या हौदामध्ये मोठ्या प्रमाणात भरलेल्या खडीची वाहतूक करताना ट्रकचालकाला मोठी कसरत करावी लागते. अति संथगतीने ट्रक चालविताना ट्रक हेलकावे घेताना काही वेळा नजरेस पडत आहे. याप्रकरणी संबंधित वाहतूक पोलीस अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. संबधित ट्रकचालकांना तसेच कंत्राटदाराला योग्य समज देण्याची व कारवाई करण्याची गरज आहे.
अपघात टाळण्यासाठी खडीवर आच्छादन आवश्यक
खडीवाहू ट्रकांवर ताडपत्रीचे आच्छादन नसल्यास वाहतुकीदरम्यान खडी रस्त्यावर पडून अपघाताचा धोका वाढतो. ट्रकच्या वेगामुळे खडीचे छोटे दगड मागील वाहनांवर उडून त्यांच्या काचा फुटू शकतात किंवा वाहनचालक जखमी होऊ शकतात. रस्त्यावर पडलेली खडी दुचाकींच्या चाकाखाली आल्यास घसरण्याची शक्यता निर्माण होते. अचानक समोर खडी पडल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटू शकतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पडलेली खडी स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक गंभीर होतो. खडी उडून पादचारी किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तींनाही दुखापत होऊ शकते. त्यामुळे खडीवाहू ट्रकांवर योग्य पद्धतीने ताडपत्रीचे आच्छादन करणे हे रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे.


