कुणबी कलेचे पुनरुज्जीवन म्हणजे गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन : मुख्यमंत्री डॉ.सावंत

चिखलीमध्ये ‘मूळ गोमंतकियांची विणकाम कला’ उपक्रमाचे उद्घाटन; १०० महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट : पारंपरिक कुणबी कलेचे पुनरुज्जीवन हा ‘स्वयंपूर्ण गोवा’च्या संकल्पनेतील महत्त्वाचा भाग असून, एकेकाळी लोप पावण्याच्या मार्गावर असलेल्या या कलेला नवसंजीवनी मिळत असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19 mins ago
कुणबी कलेचे पुनरुज्जीवन म्हणजे गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन : मुख्यमंत्री  डॉ.सावंत

वास्को : पारंपरिक कुणबी कलेचे पुनरुज्जीवन हा ‘स्वयंपूर्ण गोवा’च्या संकल्पनेतील महत्त्वाचा भाग असून, एकेकाळी लोप पावण्याच्या मार्गावर असलेल्या या कलेला नवसंजीवनी मिळत असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दाबोळी मतदारसंघातील चिखली येथील ‘जॉगर्स पार्क’जवळ ‘मूळ गोमंतकियांची विणकाम कला’ या कुणबी कलेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाचे तसेच महिला संसाधन केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

“कुणबी कलेचे पुनरुज्जीवन हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डिझायनरकडून कुणबी साड्या तसेच कुणबी परंपरेशी संबंधित विविध वस्तूंना नव्या स्वरूपात सादर केले जात आहे, हे पाहून मला आनंद होत आहे,” असे डॉ. सावंत म्हणाले.

गेल्या आठ वर्षांपासून राज्य सरकारकडून कुणबी कलेला प्रोत्साहन व सहकार्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी डिझायनर वर्मा डी’मेलो तसेच चिखली पंचायतीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी कार्यशाळा व उत्पादन केंद्राला भेट देऊन महिलांकडून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कुणबी साड्यांचे रंगकाम, डिझाईनपासून उत्पादनापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत महिला सहभागी असल्याचे त्यांनी पाहिले. पारंपरिक कुणबी नमुन्यांचा वापर आता साड्यांपुरता मर्यादित न राहता ड्रेससह विविध उत्पादनांमध्ये केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

१०० महिलांना रोजगाराचे उद्दिष्ट

दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी कुणबी कला ही गोव्याच्या पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. लोप पावत चाललेल्या या परंपरेला पुन्हा नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणासाठी महिला संसाधन केंद्र सुरू करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात १०० महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ७५ म‌हिलांना आतापर्यंत रोजगाराची संधी मिळाली आहे, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली.

महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन शालेय गणवेश, मुलांचे कपडे तसेच अन्य वस्त्रांचे उत्पादन करण्यासाठी ऑर्डर दिल्या जाणार आहेत. कौशल्यात वाढ आणि ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यानंतर महिलांना घरातून काम करण्याची संधी उपलब्ध करू्न दिली जाणार आहे. 

‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर उपक्रम

महिला संसाधन केंद्रासाठी शेड आणि शिवणयंत्रे सीएसआर निधी तसेच वैयक्तिक योगदानातून उपलब्ध करून देण्यात आल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. हा उपक्रम नफा कमावण्यासाठी नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘ना नफा, ना तोटा’  या तत्त्वावर चालवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, युवकांच्या सक्षमीकरणासाठी भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय CII) सहकार्याने मोठे शेड उभारण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. या केंद्रात युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन हॉटेल्स तसेच विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. युवकांची ऊर्जा स्वावलंबन आणि रोजगाराच्या दिशेने वळविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा