'मोठी घोषणा करणार!' आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर

'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यात खूप मोठी घोषणा करणार असल्याचे ट्विट केले आहे. या दौऱ्यामुळे सायंकाळपर्यंत गोव्याच्या राजकारणातील अनेक समीकरणे बदलणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
7 mins ago
'मोठी घोषणा करणार!' आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय पटलावर अत्यंत वेगवान आणि महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज आपल्या सोशल मीडिया हँडलवरून "मी आज गोव्यात एक खूप मोठी घोषणा करण्यासाठी जात आहे," असा थेट संदेश दिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड पार्टी' यांच्यात 'गोवा फर्स्ट' या संकल्पनेखाली एकत्र येणे आणि काँग्रेस-भाजपला पर्यायी तिसऱ्या आघाडीचा पर्याय देणे खलबते सुरू होती. याबाबत संयुक्तरित्या फलकबाजी देखील सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपने तुम्हाला दोनदा फसवले आहे. आता तिसऱ्यांदा त्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका, अशा सूचक हेडींगसह दोन्ही पक्षांवर टीका सुरू केली आहे. दरम्यान,  या दोघांविरोधात एका सक्षम 'तिसऱ्या आघाडीची' मुहूर्तमेढ रोवली जात असतानाच केजरीवाल यांचा हा दौरा निश्चित झाला आहे. त्यामुळे आजच्या या दौऱ्यात ते नेमकी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

'गोवा फर्स्ट' आघाडीची अधिकृत घोषणा?

राजकीय तज्ज्ञांच्या मते, केजरीवाल यांच्या या दौऱ्यामध्ये 'आप' आणि प्रादेशिक पक्षांची संयुक्त आघाडी घोषित केली जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपकडून आजवर गोमंतकीय मतदारांची फसवणूक झाली असल्याचे सांगत, दोन्ही पक्षांवर एकाच वेळी टीकास्त्र सोडणारा प्रचार राज्यभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल आणि स्थानिक प्रादेशिक नेतृत्व एकत्र येऊन निवडणुकीचे नवे डावपेच आखणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शिक्षण आणि इतर मुद्द्यांवर विशेष भर

अलीकडेच फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्डचे प्रमुख यांनी दिल्लीतील शैक्षणिक मॉडेलचे आणि 'आप'च्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. त्यामुळे आगामी काळात शिक्षणाचा दर्जा, स्थानिक तरुणांचे रोजगार आणि गोव्याच्या प्रादेशिक अस्मितेचे रक्षण या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून ही नवी राजकीय रणनीती आखली गेल्याचे समजते.

केजरीवाल यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे आज सायंकाळपर्यंत गोव्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा