राज्यात अनेक ठिकाणी अधीक्षकच पाहतात उपअधीक्षकांचे काम

गोवा पोलीस खात्यात उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक ठिकाणी अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवरच उपअधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे वरिष्ठ तसेच कनिष्ठ अशा दोन्ही पदांचा कार्यभार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पोलीस खात्यात अनेक पोलीस निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत असतानाही उपअधीक्षकांची रिक्त पदे अद्याप भरलेली नाहीत.

11th September, 11:44 pm
राज्यात अनेक ठिकाणी अधीक्षकच पाहतात उपअधीक्षकांचे काम

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोवा पोलीस खात्यात उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक ठिकाणी अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवरच उपअधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे वरिष्ठ तसेच कनिष्ठ अशा दोन्ही पदांचा कार्यभार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पोलीस खात्यात अनेक पोलीस निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत असतानाही उपअधीक्षकांची रिक्त पदे अद्याप भरलेली नाहीत.
गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, काही अधीक्षकांना त्यांच्या विभागातील उपअधीक्षक पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. फ्रान्सिस कॉर्त, ब्राज मिनेझिस, विश्वेश कर्पे आणि आशिष शिरोडकर यांच्याकडे दोन-दोन पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे दोन उपअधीक्षक पदांचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे, तर काहींकडे अधीक्षक आणि उपअधीक्षक अशा दोन्ही पदांची जबाबदारी आहे.
विश्वेश कर्पे, आशिष शिरोडकर, जीवबा दळवी, सिद्धांत शिरोडकर अशा काही अधिकाऱ्यांना अधीक्षकपदी बढती देण्यात आली असली, तरी त्यांच्याकडे उपअधीक्षक पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पदोन्नतीनंतरही अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठ पदानुसार स्वतंत्र कार्यभार न देता कनिष्ठ पदाची जबाबदारी सांभाळावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलीस खात्यातील अनेक पोलीस निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या बढतीची प्रक्रिया रखडल्याने उपअधीक्षकांची रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. परिणामी, उपलब्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार पडत आहे.
पदे रिक्त राहिल्याने यंत्रणेवर ताण
पदोन्नतीद्वारे रिक्त पदे न भरल्याचा परिणाम पोलीस यंत्रणेच्या तातडीच्या पर्यवेक्षण व्यवस्थेवर होत आहे. एकाच अधिकाऱ्याकडे दोन पदांची जबाबदारी असल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाजासोबतच तपास यंत्रणेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकरणांचा तपास आणि इतर पोलीस कामकाजाची कार्यवाही अपेक्षित वेगाने करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.
रिक्त उपअधीक्षक पदांची संख्या वाढण्याची भीती
गोवा पोलीस खात्यात उपअधीक्षकांची २० हून अधिक नियमित पदे रिक्त असल्याची माहिती आहे. ही संख्या ३० पेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. विधानसभा अधिवेशनात देण्यात आलेल्या आकडेवारीचा विचार केल्यास रिक्त पदांचा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे पात्र पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन ही पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा