मेरशी येथे बसची रेन्ट अ बाईकला धडक; म्हैसूरचा पर्यटक युवक ठार, दुसरा जखमी

बसचालक ताब्यात : जखमी युवकावर गोमेकॉत उपचार सुरू

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
11th September, 11:48 pm
मेरशी येथे बसची रेन्ट अ बाईकला धडक; म्हैसूरचा पर्यटक युवक ठार, दुसरा जखमी

म्हापसा : मेरशी येथील जंक्शनजवळ जीएमसीचे कर्मचारीवाहू प्रवासी बसने रेन्ट अ बाईक दुचाकीला धडक दिली. या अपघातात बसखाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेला चंदू लक्ष्मण (रा. म्हैसूर कर्नाटक) या पर्यटक युवकाचा मृत्यू झाला. तर किरण शिवन्या हा गंभीर जखमी असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

अपघात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडला होता. जुने गोवेहून पणजीच्या दिशेने जाणार्‍या दुचाकीला प्रवासी बसने मागून धडक दिली होती. अपघातग्रस्त बस ही गोवा वैद्यकीय इस्पितळातील कर्मचार्‍यांना घेऊन जात होती.

अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही पर्यटक गंभीर जखमी झाले होते. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून गोवा वैद्यकिय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना चंदू लक्ष्मण याचे निधन झाले. तर, किरण शिवन्या याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचा पंचनामा जुने गोवे पोलीस उपनिरीक्षक मनोहर धुळापकर व हवालदार विनोद फोन्वेकर यांनी केला. अपघातास कारणीभूत बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, गुरुवार, दि. १० रोजी म्हैसूर कर्नाटक येथील दहा जणांचा गट गोव्यात पर्यटनासाठी आला होता. कळंगुट येथे एका हॉटेलमध्ये हा गट उतरला होता. शुक्रवार, ११ रोजी रेन्ट अ बाईक घेऊन हा गट जुने गोवे येथे गेला होता व तिथून परतत असताना त्यांच्या एका दुचाकीला हा अपघात घडला. यात चंदू लक्ष्मण या एका मित्राचा मृत्यू झाला. 

हेही वाचा
सर्व पहा