बोरी साईबाबा मंदिर परिसरात मोठा तणाव : प्रशासनाने केला पोलीस बळाचा वापर, अनेक ग्रामस्थ ताब्यात

बोरी साईबाबा मंदिर कारभारावरून सुरू असलेल्या वादाने उग्र स्वरूप धारण केले. आज सकाळी प्रशासनाने पोलीसबळाचा वापर करून आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना ताब्यात घेतले. पोलीस संरक्षणात ट्रस्टला मंदिरात प्रवेश देण्यात आल्याने परिसरात तणाव वाढला आहे. काय प्रकरण ? वाचा सविस्तर.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
बोरी साईबाबा मंदिर परिसरात मोठा तणाव : प्रशासनाने केला पोलीस बळाचा वापर, अनेक ग्रामस्थ ताब्यात

पणजी : उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या सीमेवर असलेल्या फोंडा तालुक्यातील बोरी येथील प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या व्यवस्थापनावरून गावकरी आणि श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टचे विद्यमान पदाधिकारी यांच्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोठी कारवाई केली आहे. मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मंदिरात ठिय्या मांडून बसलेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.



कडक पोलीस बंदोबस्त आणि तणावपूर्ण परिस्थिती

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत बोरी येथील साईबाबा मंदिर परिसरातून आंदोलक ग्रामस्थांना हटवण्यासाठी आज सकाळी प्रशासनाने पोलीस बळाचा वापर केला. फोंडा, कुडचडे आणि मडगाव पोलीस ठाण्यांतून मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा घटनास्थळी पाचारण करण्यात आला आहे. मंदिर परिसरात आणि गर्भगृहाच्या आसपास उपस्थित असलेल्या सुमारे ५० ग्रामस्थांपैकी २० ते २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मामलेदार आणि उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस सरंक्षणात साईबाबा मंदिर ट्रस्टच्या सदस्यांना मंदिर आवारात आणि कार्यालयात प्रवेश देण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण बोरी गावात आणि परिसरात तणावाचे सावट पसरले आहे.




उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साईबाबा मंदिर समितीने घेतला मंदिराचा ताबा 

गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर बोरी येथील श्री साईबाबा मंदिराचा ताबा मंदिर समितीने अधिकृतपणे आपल्या हाती घेतला आहे. प्रशासकीय संरक्षण मिळताच मंदिर समितीच्या सदस्यांनी मंदिर परिसर, मुख्य सभागृह आणि कार्यालयीन इमारतीची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर कार्यालयाची कुलपे उघडून ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. न्यायालयाच्या निर्देशांनुसार परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखत ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली असून, सध्या मंदिर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सध्या समितीचे सदस्य सध्या मंदिर कार्यालयाची पाहणी करत आहेत.




नेमका वाद काय आणि काय आहेत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद?

बोरी येथील साईबाबा मंदिराच्या व्यवस्थापनाचा आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीचा ताबा नेमका कोणाकडे असावा, यावरून स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यमान ट्रस्ट यांच्यात गेल्या काही काळापासून तीव्र संघर्ष सुरू आहे. जुलैच्या मध्यात हा वाद उघडपणे चव्हाट्यावर आला होता. ग्रामस्थांनी मंदिरावर स्वतःची कुलपे लावून ताबा मिळवल्याचा दावा केला होता.



ग्रामस्थांच्या वतीने अक्षय नाईक आणि इतर सहकाऱ्यांनी ट्रस्टच्या विद्यमान मंडळावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दिलेल्या  स्थानिक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे मंदिर उभारले होते. सुरुवातीला दर तीन वर्षांनी व्यवस्थापन समिती बदलण्याचा स्पष्ट नियम होता. मात्र, काही सदस्यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेवून स्वतःचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केला आणि संपूर्ण कारभार ताब्यात घेतला. याशिवाय, मंदिरात जमा झालेल्या सुमारे ८ कोटी रुपयांच्या निधीचा कोणताही स्पष्ट हिशोब दिला गेला नाही, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच, गुरुवारच्या पूजेचे दर पूर्वीच्या ३५ हजार रुपयांवरून थेट ९५ हजार रुपये आणि श्रावणी गुरुवारचे दर ८० हजार रुपयांवरून तब्बल ३ लाख रुपये करून भाविकांची लूट चालवली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच मंदिराच्या नावे आयकर विभागाची १ कोटी ६ लाख रुपयांची नोटीस आल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला होता.



दुसऱ्या बाजूने, साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश रायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले होते. मंदिराचा सर्व कारभार कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून निधीचा वापर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयकर विभागाची नोटीस ही सध्याच्या समितीच्या काळातील नसून पूर्वीच्या समितीच्या काळातील असल्याचे त्यांनी सांगत सर्व जमा-खर्चाचा हिशोब योग्य असल्याचे स्पष्ट केले होते.


बेकायदेशीर प्रवेश आणि तोडफोडीचा गुन्हा

हा वाद केवळ पत्रकार परिषदा पुरता मर्यादित न राहता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मंदिराच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करणे, चोरी करणे आणि कर्मचाऱ्यांना धमकावणे या आरोपांखाली फोंडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. दिवाणी न्यायालयाची मनाई (स्टे ऑर्डर) लागू असतानाही मंदिराची कुलपे तोडणे, कार्यालयात घुसून सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) आणि संगणकाची हार्ड डिस्क काढून नेल्याचा आरोप ट्रस्टने ग्रामस्थांवर केला होता.



या तक्रारीच्या आधारे फोंडा पोलिसांनी ९ नामांकित व्यक्तींसह सुमारे ३० अज्ञात लोकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत बेकायदेशीर जनसमुदाय जमवणे, अतिक्रमण, चोरी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. या घटनाक्रमानंतर दोन्ही बाजूंनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर, गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतर प्रशासनाने कारवाई करत मंदिराचा ताबा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून ग्रामस्थांना हटवण्यास सुरुवात केली आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा
सर्व पहा