ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी आसगावच्या 'कीकी बाय द सी' रेस्टॉरंटच्या मालक, व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांची कारवाई

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी आसगावच्या 'कीकी बाय द सी' रेस्टॉरंटच्या मालक, व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

पणजी : आसगाव येथील प्रसिद्ध 'कीकी बाय द सी' (M/s Kiki By The Sea) या रेस्टॉरंटमध्ये निर्धारित आवाजाची मर्यादा ओलांडून रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याप्रकरणी हणजूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (GSPCB) प्राप्त झालेल्या ईमेल तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक (PSI) अमीर तराळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ सप्टेंबर २०२६ च्या रात्री ११:०० वाजेपासून ९ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री १२:०० वाजेच्या दरम्यान 'कीकी बाय द सी' या रेस्टॉरंटमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात संगीत सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पाहणीत ध्वनीची पातळी ६९.५० डीबी(ए) नोंदवली गेली. ही पातळी कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले.

परिसरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून 'कीकी बाय द सी'चे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध 'द नॉईज पोल्युशन (रेग्युलेशन अँड कंट्रोल) रुल्स २०००' चे कलम ५ आणि 'पर्यावरण संरक्षण कायदा १९८६' च्या कलम १५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमीर तराळ करत आहेत.



हेही वाचा
सर्व पहा