गोव्यातून बेळगावला १६.२० लाख किलो भाजी निर्यात

काकडीला सर्वाधिक पसंती : विक्रीतून २८.८५ लाख रुपयांचा मिळाला दर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th September, 09:43 pm
गोव्यातून बेळगावला १६.२० लाख किलो भाजी निर्यात

गोव्यात भाजी बेळगावहून येते, हे आपण नेहमी ऐकतो. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत याच्या उलट चित्र पाहायला मिळाले आहे. गोव्यातून तब्बल १६.२० लाख किलो भाजी बेळगावला पाठवण्यात आली आहे. या भाजीला २८.८५ लाख रुपयांचा दर मिळाला असून, त्यात सर्वाधिक ४२ टक्के निर्यात एकट्या काकडीची झाली आहे, असे गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने सांगितले.

गोवा राज्य फलोत्पादन विकास महामंडळ स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली भाजी सर्वप्रथम स्वतःच्या आउटलेट्स आणि स्थानिक खासगी विक्रेत्यांना वितरित करते. राज्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर उरलेली भाजी विक्रीसाठी बेळगाव मार्केट यार्डात पाठवली जाते. सध्याची मागणी आणि बाजारातील गरज लक्षात घेऊन संबंधित पुरवठादार ही भाजी बेळगावला पाठवतात आणि त्यानंतर हा पुरवठादार बेळगाव बाजारात किंवा मोठ्या खासगी विक्रेत्यांना भाजी विकतो, असे गोवा राज्य फलोत्पादन विकास महामंडळाने सांगितले.

भाजी निर्यातीत लक्षणीय वाढ

सन २०२२-२३ ते २०२६-२७ (ऑगस्टपर्यंत) या कालावधीत भाजीच्या निर्यातीमध्ये बरीच वाढ झाली आहे. मात्र, २०२४-२५ मध्ये भाजीच्या पुरवठ्यात १.४२ लाख किलोची घट नोंदवली गेली. त्याच वर्षी भाजीच्या दरात २ लाख रुपयांची वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

वर्षनिहाय झालेली निर्यात अन् दर

वर्ष २०२२-२३ मध्ये २२,३६० किलो भाजीची निर्यात होऊन १.८३ लाख रुपये दर मिळाला. २०२३-२४ मध्ये ३.६५ लाख किलो भाजी निर्यात झाली आणि त्याचा ६.१४ लाख रुपये दर मिळाला. २०२४-२५ मध्ये २.२० लाख किलो भाजीची निर्यात होऊन ८.१६ लाख रुपये मिळाले. २०२५-२६ मध्ये ६.०३ लाख किलो भाजी निर्यात झाली आणि ७.६९ लाख रुपयांचा दर मिळाला. तर, २०२६-२७ मध्ये १६ ऑगस्टपर्यंत ४.०८ लाख किलो भाजीची निर्यात झाली असून, तिचा ५.०१ लाख रुपये दर मिळाला आहे.

विविध भाज्यांचा बेळगावला पुरवठा

गेल्या साडेचार वर्षांत गोव्यातून बेळगावला अनेक भाज्या पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये गावठी काकडी ६.९६ लाख किलो, भेंडी ३.७२ लाख किलो, चिटकी ३.४४ लाख किलो, पडवळ १.६५ लाख किलो, वांगी १९,५२४ किलो, हिरवी मिरची १२,६८३ किलो आणि कारली ७,२६९ किलो याप्रमाणे बेळगावला पाठवण्यात आली.

बेळगावला पाठवलेली भाजी (किलोमध्ये)
भाजी२०२२-२३२०२३-२४२०२४-२५२०२५-२६२०२६-२७*
भेंडी३,५९१३६,६२७१,२६,९५२६९,४५३१,३५,९०७
कारले१००३२-१६८६,९६९
पडवळ२,८५५३८,००३१६,९०२४०,१६०६७,१६२
वांगी३१६३,०७७५,३७४३,४५६७,३०१
चिटकी५,४०८२३,७४३३२,६२०१,३९,७५४१,४३,१००
काकडी४,९७०२,५९,०६०३५,५४६३,४९,६२३४७,६४०
हिरवी मिरची५,१२०३,२४५३,४६८५६२२८८

* २०२६-२७ : १६ ऑगस्टपर्यंत

हेही वाचा
सर्व पहा