माल्कम परेराच्या अटकपूर्व जामीन अर्जाला पोलिसांकडूनही विरोध

सरपंचांना धक्काबुक्की प्रकरण : संशयिताच्या कोठडीतील चौकशीची मागणी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
1 hours ago
माल्कम परेराच्या अटकपूर्व जामीन अर्जाला पोलिसांकडूनही विरोध

मडगाव : चिंचणीचे सरपंच जेर्सन गोम्स यांना जिन्यावरून ढकलून मारहाण केल्याप्रकरणी संशयित माल्कम परेरा (४७, रा. चिंचणी) याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला कुंकळ्ळी पोलिसांनी विरोध केला आहे. संशयिताची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणी गोम्स यांच्याकडून हस्तक्षेप अर्ज सादर करण्यात आला. या अर्जावर युक्तिवाद झाला असून, पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी ११ वा. होणार आहे.

७ सप्टेंबर रोजी पंचायत कार्यालयात सोपो कर वसुलीच्या मुद्द्यावरून परेरा आणि सरपंच गोम्स यांच्यात वाद झाला. त्यानंतर गोम्स कार्यालयातून बाहेर पडत असताना परेराने त्यांना मागून जिन्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. खाली पडल्यानंतरही त्यांच्या छातीवर व डोक्यावर लाथा मारल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
घटनेनंतर जखमी गोम्स यांच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. संशयिताने घटनेच्या वेळी आयफोनच्या माध्यमातून कथितरीत्या थेट ध्वनिचित्रफितीचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर तो या प्रकरणाशी संबंधित ध्वनिचित्रफिती फेसबुकवर सातत्याने प्रसारित करत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची किंवा धमकावण्याची शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला.
सरपंचांच्या कुटुंबालाही धमकी
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताने सरपंचांच्या घराजवळ जाऊन प्रकरण मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सरपंचांचा मुलगा जेरोस्लाव गोम्स याने केल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संशयिताचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तपासात तो पूर्ण सहकार्य करत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, गोम्स यांच्यावतीनेही हस्तक्षेप अर्ज दाखल करून अटकपूर्व जामिनाला विरोध करण्यात आला आहे.