तुळशीमळ पर्ये पुलावरून वाळवंटी नदीत पडून वृद्ध बेपत्ता

शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
तुळशीमळ पर्ये पुलावरून वाळवंटी नदीत पडून वृद्ध बेपत्ता

वाळपई : पर्ये ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या तुळशीमळ येथील पुलावरून वाळवंटी नदी पार करत असताना पडोसे येथील ६५ वर्षीय सुधीर नाडकर्णी हे पाय घसरून नदीच्या पाण्यात पडल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अग्निशामक दलाच्या जवानांसह नौदलाचे अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबविली. मात्र, मंगळवारी उशिरापर्यंत त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

तुळशीमाळ येथे वाळवंटी नदी पार करण्यासाठी पूल आहे. सुधीर नाडकर्णी हे नदी पार करून पडोसे येथील आपल्या घराकडे जात असताना पुलावरून त्यांचा पाय घसरला आणि ते थेट नदीच्या पाण्यात पडले. सोमवारी सकाळपासूनच परिसरात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यातच नदीच्या प्रवाहालाही वेग आला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास नाडकर्णी नदीत पडले. ते पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जात असताना काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी मदतीसाठी हातवारे केल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरण्याचे धाडस कोणालाही करता आले नाही. काही क्षणांतच नाडकर्णी पाण्यात बुडाले आणि त्यानंतर ते दिसेनासे झाले.

अंधारामुळे रात्रीची शोधमोहीम थांबवली

डिचोली अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी नदीच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, रात्रीचा अंधार, नदीचा वाढलेला प्रवाह आणि खडकाळ नदीपात्र यामुळे शोधमोहीम राबविण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. नागरिकांच्या सुरक्षेचाही विचार करून रात्री उशिरा शोधमोहीम थांबवावी लागली.

मंगळवारी सकाळी पुन्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. नदीच्या विविध भागांमध्ये तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र, बचाव पथकाला अपेक्षित यश मिळाले नाही.

सुधीर नाडकर्णी हे नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी दिवसभर त्यांचा शोध सुरू असल्याने नाडकर्णी कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी आणि नदीकाठावर उपस्थित होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळपर्यंत शोध लागला नसल्याने कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली आहे.

नौदल, एनडीआरएफचीही मदत

शोधमोहीम अधिक व्यापक करण्यासाठी नौदलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी दुपारच्या सुमारास नौदलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीच्या पात्रात तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर एनडीआरएफच्या पथकानेही शोधकार्यात सहभाग घेतला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत नाडकर्णी यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा