म्हापसा : गणेशपुरी, म्हापसा येथील गृहनिर्माण वसाहतीमधील माजी नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांचा बंगला आणि प्रज्योत शिरोडकर यांचा फ्लॅटमध्ये चोरी करणारी सराईत टोळी ही मध्यप्रदेश किंवा परराज्यातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी पर्वरी व पेडे-म्हापसा येथे झालेल्या घरफोडीमध्ये याच टोळीचा हात असण्याचा संशयही पोलिसांना आहे.
४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घरफोडी करण्यात आली होती. बिचोलकर व शिरोडकर यांच्या घरातून सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या टोळीने ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे उघडकीस आले आहे. चेहऱ्यावर मास्क लावलेल्या पाच अज्ञात चोरांचा या चोरीमध्ये समावेश असून त्यांच्या कार्यपद्धतीवरून ही टोळी मध्यप्रदेश किंवा परराज्यातील सराईत टोळी असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.
जानेवारी २०२६ मध्ये पेडे-म्हापसा आणि सुकूर-पर्वरी येथील आलिशान कॉम्प्लेक्समधील बंद फ्लॅटमध्ये घरफोड्या झाल्या होत्या. त्या घटनांची आणि गणेशपुरीतील चोरीची कार्यपद्धती समान असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या घटनांमागे एकाच टोळीचा हात आहे का, याचा तपास सुरू आहे.
घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. संशयितांनी चोरीपूर्वी परिसरातील काही घरे आणि फ्लॅटची रेकी केल्याचे हालचालींवरून दिसून आले आहे. मात्र, काही घरे बंद नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथे चोरीचा प्रयत्न केला नसल्याचेही तपासात आढळले आहे. म्हापसा पोलीस या चोरीचा छडा लावण्यासाठी सर्वते प्रयत्न करत असून, पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.
केवळ रोख रक्कम, दागिन्यांवर डल्ला
टोळीने दोन्ही घरांतील कपाटे फोडून केवळ रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले. इतर कोणत्याही वस्तूंना त्यांनी हात लावला नाही. त्यामुळे ही टोळी घरफोडी करण्यात अनुभवी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चोरीनंतर मुख्य रस्त्याचा वापर न करता जंगलातील पायवाटेने त्यांनी पलायन केले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दिवसभर झाडीत लपून रेकी?
घटनेच्या दिवशी टोळीतील सदस्य दिवसभर गणेशपुरी परिसरातील दाट झाडाझुडपांमध्ये लपून बसले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तेथून त्यांनी परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून बंद घरे आणि फ्लॅटची रेकी केली असावी. मध्यरात्री परिसर शांत झाल्यानंतर झाडीतून बाहेर पडत अवघ्या काही मिनिटांत बंगला आणि फ्लॅट फोडून त्यांनी पलायन केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गणेशपुरी परिसरातील वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथे तातडीने कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी गणेशपुरीतील रहिवासी तथा माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी केली आहे.
गणेशपुरीत काही महिन्यांपूर्वी एका डॉक्टरांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यानंतर माजी नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे मुखवटे घालून आणि प्राणघातक शस्त्रांसह घरफोड्या करीत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे शिरोडकर यांनी म्हटले.
गणेशपुरीत पोलीस आऊटपोस्टसाठी यापूर्वी जागा दाखविण्यात आली होती. मात्र ती अपुरी असल्याने पोलिसांनी मोठ्या जागेची मागणी केली होती. सद्यस्थितीत म्हापसा पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बळ वाढवण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे स्थानिक आमदार व सरकारने लक्ष घालून गणेशपुरीत कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी, अशी मागणी शिरोडकर यांनी केली.
गणेशपुरी रेसिडेन्शियल असोसिएशनकडून सीसीटीव्ही व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी ३०० हून अधिक घरांच्या वसाहतीसाठी केवळ सुरक्षारक्षक पुरेसे ठरणार नाहीत, असे शिरोडकर म्हणाले. पोलिसांनी अंतर्गत रस्त्यांवर नियमित गस्त घालावी तसेच शहरातील विविध ठिकाणी सातत्याने नाकाबंदी करावी, अशी मागणी त्यांनी केली.


