तिरुनेलवेली : गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांचा सरपंचासोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपीने सरपंचावर विटेने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली.
महाराजन असे मृत सरपंचाचे नाव आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून गावात नाराजीचे वातावरण होते. याच मुद्द्यावरून महाराजन आणि एसाकी पांडियन यांच्यात वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील पाणीटंचाईमुळे एसाकी पांडियन नाराज होता. पाण्याच्या अनियमित पुरवठ्यावरून त्याचा सरपंच महाराजन यांच्याशी वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या एसाकी पांडियनने महाराजन यांच्यावर विटेने हल्ला केला. या हल्ल्यात महाराजन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी एसाकी पांडियनविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
कनिमोझी यांनी म्हटले की, वल्लियूरजवळील कन्ननल्लूर येथे पिण्याच्या पाण्याच्या संकटाविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत असताना पंचायत अध्यक्ष महाराजन यांची हत्या झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. लोकप्रतिनिधी, महिला आणि मुलांनाही सुरक्षितता नसल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली आहे.


