दुचाकीला कारने धडक देऊन नेले फरफटत; दुचाकीस्वाराचा मृत्यू

सांकवाळ येथे अपघात : दोन्ही वाहने आगीत भस्मसात

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
04th September, 10:17 pm
दुचाकीला कारने धडक देऊन नेले फरफटत; दुचाकीस्वाराचा मृत्यू

वास्को : सांकवाळच्या अंतर्गत रस्त्यावर एका दुचाकीला ठोकरल्यावर कारच्या पुढील भागात अडकलेल्या दुचाकीला सुमारे एक किलोमीटर फरफटत नेणाऱ्या मर्सिडिज कारला आग लागल्याने तिचा बहुतांश भाग आगीत खाक झाला. तर दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. या धडकेमुळे उसळून रस्त्याकडेला पडलेल्या जखमी दुचाकीचालकाला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला.


अपघात शुक्रवार, दि. ४ रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडला. कार उपासनगर येथून उतार असलेल्या सांकवाळच्या अंतर्गत रस्त्याने वेगाने जात असताना कारची जोरदार धडक एका दुचाकीला बसली. या धडकेने दुचाकीचालक उसळून रस्त्याकडेच्या झुडुपात पडला. त्यानंतर थांबण्याऐवजी कारचालकाने कार वेगाने तशीच पुढे नेली. मात्र, या कारच्या पुढील भागात ती दुचाकी अडकल्याचे त्या कारचालकाच्या ध्यानीमनी नव्हते. सुमारे एक किलोमीटर त्याने त्या दुचाकीसह कार पुढे नेली. दरम्यान, कार व दुचाकीचे काही भाग रस्त्यावर पडले होते. कारसह दुचाकी फरफटत आल्याने कदाचित घर्षणामुळे ठिणगी उडून कारच्या पुढील भागात आग लागली. कार सेंट जोसेफ वाझ सँच्युअरीसमोर थांबल्यावर तेथे असलेल्या एका स्थानिकाने व तेथून जाणाऱ्या एका दुचाकीचालकाने त्या कारचालकाला बाहेर येण्यास सांगितले. तथापी तो बाहेर येण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे त्याला खेचून बाहेर काढण्यात आले. कार व दुचाकीला आग लागल्याने तसेच तो दुचाकीचालक जखमी झाल्याने रुग्णवाहिका व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णवाहिका व अग्निशमन दल तेथे पोहचले. जखमींना इस्पितळात नेण्यात आले. अग्निशमन दलाने कारला लागलेली आग विझविली. आगीत दुचाकी पूर्णपणे खाक झाली. तर कारचा मागील भाग वगळता इतर सर्व भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सदर घटना घडली तेव्हा तेथील शाळा सुटली होती. तथापी त्या कारला आग लागल्याने तेथील दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. आग लागलेली कार तशीच पुढे गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

कारला आग चालक मात्र अनभिज्ञ

आग लागल्यावर कारचालक कारमध्ये बसून राहिला होता. तथापी तेथील स्थानिकांनी धावपळ करून त्याला कारबाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, आपल्या हातून काय घडले याची त्याला कल्पनाही नव्हती. याप्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू होती.