पेडणे : पत्रादेवी येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर दुचाकीची धडक बसून जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगेश रघुनाथ गावडे (वय ५३, रा. सरमळे, कुंभारवाडी, सिंधुदुर्ग) असे मृताचे नाव आहे. हा अपघात २३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४० वाजता घडला.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल राजाराम तारी (वय २३, रा. तारीवाडी, ओटवणे, सिंधुदुर्ग) हा एमएच १४ जीएक्स ८२२२ क्रमांकाची बजाज पल्सर एनएस २०० दुचाकी घेऊन तोरसेहून बांद्याच्या दिशेने जात होता. पत्रादेवी येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाजवळ मार्ग ओलांडत असलेल्या मंगेश गावडे यांना त्याच्या दुचाकीची धडक बसली.
अपघातात गावडे यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना दुखापती झाल्या. त्यांच्यावर बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना २४ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार तारी यालाही किरकोळ दुखापत झाली असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दुचाकीस्वाराने आवश्यक खबरदारी न घेता बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पेडणे पोलीस स्थानकातील हवालदार प्रसाद चंद्रकांत तुयेकर यांनी तक्रार दाखल केली. अपघाताच्या चौकशीनंतर पेडणे पोलिसांनी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १.५२ वाजता दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ) आणि १०६ (१) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


