‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणात वकील राशेश शहाला अटक

सातवा संशयित गजाआड : मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीची कारवाई

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
24th October, 11:07 pm
‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणात वकील राशेश शहाला अटक

म्हापसा : सासष्टी तालुक्यातील एका महिलेची २.६० कोटी रुपयांची ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने मुंबईस्थित वकील अॅड. राशेश भरतकुमार उपाध्याय ऊर्फ राशेश शहा याला पीएमएलए कायद्यांतर्गत अटक केली.

आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटमधील अटक झालेला अॅड. राशेश शहा हा सातवा आरोपी आहे. यापूर्वी मुकेश कुमार पुखराज जैन उर्फ मुकेश भाई, फहीम मोईन हुसेन सय्यद, नईम मुईन सय्यद, भूषण मोये, शैलेश चव्हाण आणि विलास पवार या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

ईडीमच्या पथकाने ही कारवाई शनिवार, दि. २४ रोजी पहाटेच्या सुमारास केली. संशयित उपाध्याय हा मुंबईहून दिल्लीला पळून जाण्याचा प्रयत्नात होता. मुंबई विमानतळावरील बोर्डिंग गेटवर मुंबई सीमाशुल्क विभाग आणि सीआयएसएफच्या मदतीने त्याला गजाआड करण्यात आले. संशयिताला उत्तर गोवा विशेष न्यायालयाने (पीएमएलए) पाच दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे.

याआधी अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये या नेटवर्कचे दोन सूत्रधार फहीम मोईन हुसेन सय्यद आणि नईम मुईन सय्यद यांचा समावेश आहे. तसेच, गोठवलेली खाती पुन्हा सुरू करून दिली, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराला डिजिटल अरेस्टद्वारे बनावट ट्राय आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून संशयितांनी धमकावले व सर्वोच्च न्यायालयाचा बनावट आदेश दाखवून सुमारे २.६ कोटी रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. हे पैसे ४०० हून अधिक म्युल खात्यांमार्फत वळवण्यात आले होते. जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांनी मुंबईतील कॅनरा बँकेत या महिलेच्या नावावर खाते उघडून त्यात ६ कोटी रुपये जमा केल्याची सांगितले होते.

या नेटवर्कद्वारे सुमारे २८,००० कोटी रुपयांचे बँकिंग व्यवहार झाले आणि सुमारे २,९०० कोटी रुपये रोख स्वरूपात जमा करण्यात आले. देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३०० हून अधिक तक्रारी आणि १६० हून अधिक गुन्ह्यांमध्ये या नेटवर्कशी संबंधित खात्यांचा उल्लेख आढळतो. यामध्ये पीडितांना ४०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालण्यात आला आहे.

संशयित उपाध्याय हा या सायबर फसवणूक नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात समोर आले आहे. सायबर फसवणुकीच्या तक्रारींनंतर या नेटवर्कशी संबंधित बँक खाती गोठवण्यात येत होती. अशावेळी उपाध्याय संबंधित तपास यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना ‘अंगडिया’ (पेढी) मार्फत रोख रकमेच्या स्वरूपात लाच देऊन ही खाती पुन्हा सुरू करून घेत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

त्याने विविध एजंट्ससाठी सुमारे १०० गोठवलेली खाती पुन्हा सुरू करून दिली होती. ज्यामध्ये एका व्यवहारासाठी ६० लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली गेली होती. फसवणुकीद्वारे मिळवलेली आणि गोठवलेली रक्कम पुन्हा उपलब्ध करून देऊन, त्याने देशभरात सुरू असलेल्या ‘डिजिटल फ्रॉड’च्या मनी लाँड्रिंग यंत्रणेला सक्रिय ठेवले होते.

ईडीच्या शोधानंतरही त्याने आपले काम सुरूच ठेवले. पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने सहआरोपींसोबतचे त्याचे चॅट्स डिलीट केले आणि त्याचे सर्व ज्ञात फोन बंद केले.

वकील म्हणून नोंदणीकृत असूनही, तो कोणत्याही आरोपीसाठी किंवा त्यांच्या कंपन्यांसाठी कधीही न्यायालयात हजर झाला नाही किंवा वकालतनामा दाखल केला नाही. त्याने लाचखोरीसाठी आपल्या व्यवसायाचा गैरवापर केला.


हेही वाचा
सर्व पहा