मुलगा दारू पित असल्याची माहिती वडिलांना दिल्याने कामगाराचा खून

कला अकादमीतील हत्या प्रकरण; अजय कुमारची पोलिसांसमोर कबुली

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
21st October, 11:42 pm
मुलगा दारू पित असल्याची माहिती वडिलांना दिल्याने कामगाराचा खून

पणजी : कला अकादमीच्या आवारात जुमा धोबी (३०, मूळ बिहार) या कामगाराचा डोके ठेचून खून केल्याप्रकरणामागचे कारण समोर आले आहे. आपण गोव्यात दारू पित असल्याची माहिती जुमा धोबी याने फोन करून वडिलांना दिल्याच्या रागातून अजय कुमार याने त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित रितेश कुमार पास्वान याचा खुनात सहभाग नसल्याचेही प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरच्या रात्री जुमा धोबी, अजय कुमार आणि रितेश कुमार पास्वान हे तिघे जेवण करताना दारू पीत होते. यावेळी दारूच्या नशेत जुमा याने अजयच्या वडिलांना फोन करून त्यांचा मुलगा गोव्यात दारू पीत असल्याचे सांगितले. यावरून जुमा आणि अजय यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर जुमा झोपल्यानंतर अजयने लोखंडी पट्टीने त्याच्या डोक्यावर वार केले. यात जुमा याचा मृत्यू झाला. अजयने पोलिसांना दिलेल्या जबाबातून ही माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले.
खुनानंतर दोघेही झाले फरार
घटनेच्या वेळी रितेश कुमार पास्वान झोपलेला होता. खून केल्यानंतर अजयने त्याला उठवून आपण जुमा याचा खून केल्याचे सांगितले. घटनास्थळी थांबल्यास लोक मारहाण करतील, अशी भीती घालून अजयने रितेशलाही तेथून पळून जाण्यास सांगितले. त्यानंतर दोघेही फरार झाले.
दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी जगदीशकुमार रांका यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी कामासाठी फोंडा येथील बाजारातून हमाली करणाऱ्या तिघांना आणले होते. त्यातील जुमा धोबी याचा खून झाल्याची माहिती १६ ऑक्टोबर रोजी सकाळी पणजी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून अजय कुमार आणि रितेश कुमार पास्वान यांना अटक केली. दोन्ही संशयितांना प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खुनामागील नेमके कारण आणि दुसऱ्या संशयिताची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.