कांदोळीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांची दोषमुक्तता

पोक्सो न्यायालयाचा निवाडा : आरोप निश्चित करण्याइतके पुरावे नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th October, 11:49 pm
कांदोळीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांची दोषमुक्तता

म्हापसा : कांदोळी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात आकाश ऊर्फ अक्षया पवार (२०) आणि अनिल राठोड (२७, दोघेही विजयापुरा, कर्नाटक) यांची मेरशी येथील पोक्सो विशेष जलदगती न्यायालयाने दोषमुक्तता केली आहे. या दोघांविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे निरीक्षण न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी नोंदवले.
भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे आणि पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत दाखल प्रकरणातून आरोपमुक्त करण्यासाठी दोघांनी अर्ज केला होता. न्यायालयाने तो मंजूर केला. पीडितेने आणखी दोन व्यक्तींनी अत्याचार केल्याचे सांगितले असतानाही शिकारीपुरा किंवा कळंगुट पोलिसांनी त्यांची ओळख परेड घेतली नाही. तसेच, पीडितेने या दोघांची नावे घेऊन ओळख पटविल्याचा पूरक जबाबही उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. गेस्ट हाऊस मालकाचा जबाब आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसा नसल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासल्याचे किंवा जप्त केल्याचेही दिसून आले नाही.
हा सामूहिक बलात्काराचा गुन्हा ८ ते १० जानेवारी दरम्यान कांदोळीतील एका गेस्ट हाऊसमध्ये घडला होता. घरातून निघून गोव्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची कळंगुट समुद्रकिनारी प्रवीण चव्हाण (वय २८, रा. विजयापुरा कर्नाटक) याच्याशी ओळख झाली. खोलीची व्यवस्था करून देण्याच्या बहाण्याने प्रवीणने तिला गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आल्याचा आणि तेथे आपले मित्र आकाश आणि अनिल या तिघांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. ‍
कथित अत्याचाराची घटना गोव्यातील कांदोळी येथे घडल्याने हे प्रकरण पुढील तपासासाठी कळंगुट पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणातील तपासादरम्यान उपलब्ध पुरावे आणि पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा विचार करून न्यायालयाने आकाश पवार आणि अनिल राठोड यांना आरोपमुक्त केले.
गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड
घरी परतल्यानंतर पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर पीडितेच्या वडिलांनी कर्नाटकातील शिकारीपुरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली.

हेही वाचा
सर्व पहा