१९ रुपयांचे रिचार्ज पडले ५ हजार रुपयांना!

धारबांदोडाहून फोंडा येथे लिफ्ट घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय युवकाला कार चालकाचा गंडा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
१९ रुपयांचे रिचार्ज पडले ५ हजार रुपयांना!

फोंडा : धारबांदोडा येथून फोंड्याला जाण्यासाठी लिफ्ट घेणाऱ्या एका परप्रांतीय युवकाला भामट्या कारचालकाने १९ रुपयांच्या मोबाईल रिचार्जच्या बहाण्याने तब्बल ५ हजार रुपयांचा गंडा घातला. याशिवाय, युवकाच्या मोबाईलमधील दोन्ही सिमकार्डही त्याच्याशी बोलत असल्याचे नाटक करून काढून घेतली. या प्रकारामुळे फोंड्यासह धारबांदोडा तालुक्यातही सायबर गुन्हे घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फोंडा तालुक्यात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात फोंडा परिसरातील एका पत्रकाराच्या बँक खात्यातील रक्कम लंपास करण्याचा अज्ञात व्यक्तीचा प्रयत्न फसला होता. यानंतर बुधवारी आणखी एक घटना उघडकीस आली.

गेल्या बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोले येथील एक युवक फोंड्याला जाण्यासाठी निघाला होता. तो एका खासगी वाहनातून धारबांदोडा येथील सावर्डे जंक्शनपर्यंत आला. संबंधित वाहन सावर्डे मार्गाने जात असल्याने चालकाने त्याला तेथे उतरवले. त्यानंतर युवकाने फोंड्याला जाण्यासाठी रस्त्यावर उभे राहून वाहनांकडे लिफ्ट मागण्यास सुरुवात केली. यावेळी एक कार त्याच्याजवळ थांबली. कारचालकाने युवकाला गाडीत बसवून त्याच्याशी चर्चा सुरू केली.

तिस्क-उसगाव येथे पोहोचल्यानंतर कारचालकाने मोबाईल रिचार्ज करण्यासाठी युवकाला २० रुपये दिले. युवकाने स्वतःच्या मोबाईलवरून रिचार्ज केला. या प्रवासादरम्यान कारचालकाने आपण वाहतूक कंत्राटदार असल्याचेही युवकाला सांगितले होते. त्यानंतर कारचालकाने तिस्क-उसगाव येथील एका गॅरेजमध्ये कार उभी करून तिच्या दिव्याची दुरुस्ती करून घेतली. पुढे फोंड्याच्या दिशेने जात असताना कारचालकाने युवकाकडे फोन करण्यासाठी त्याचा मोबाईल मागितला. युवकाने विश्वास ठेवून आपला मोबाईल त्याच्या हातात दिला. मात्र, फोनवर बोलत असल्याचे नाटक करत कारचालकाने युवकाच्या मोबाईलमधील दोन्ही सिमकार्ड काढून घेतली. त्यानंतर फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर युवकाला उतरवून तो पसार झाला.

काही वेळानंतर युवकाच्या बँक खात्यातून ५ हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले. गुरुवारी मोले परिसरातील बँकेत जाऊन खात्याची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. युवकाने दिलेल्या माहितीनुसार, १९ रुपयांचे मोबाईल रिचार्ज करताना कारचालकाने त्याचा गोपनीय कोड पाहिला होता. त्यानंतर मोबाईलमधील सिमकार्डचा वापर करून बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा संशय आहे.

बँक खात्यातून पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवकाने खाते बंद केले आहे. मात्र, आपली दोन्ही सिमकार्ड संबंधित कारचालकाच्या ताब्यात असल्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिओ आणि बीएसएनएलच्या कार्यालयांनाही माहिती देण्यात आली आहे.

अनोळखी व्यक्तीला मोबाईल देणे टाळा!

सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या हातात आपला मोबाईल देऊ नये, असे आवाहन फोंडा पोलिसांनी केले आहे.