मडगाव : रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचालकाचा ताबा सुटून तो कारच्या चाकाखाली आला. या अपघात प्रकरणी कारचालकाला निष्काळजीपणासाठी जबाबदार धरता येणार नसल्याचे निरीक्षण नोंदवत मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने संशयित कारचालकाविरोधातील खटला बंद केला.
न्यायाधीश ऑडी श्नूर ऊर्फ जगदीश पांडुरंग यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. या प्रकरणात आंतोनियो वालेस (४७, रा. माकाझाना, सासष्टी) यांच्याविरुद्ध मडगाव पोलिसांनी २०१७ मधील अपघातप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३०४-अ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर २०२१ मध्ये न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या वतीने वकिलांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २५८ अंतर्गत खटला बंद करण्यासाठी अर्ज केला होता.
या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी कोन्सासिओ झेवियर डायस यांनी दिलेल्या साक्षीनुसार, रस्त्यावरील खड्ड्यामुळे समोरून येणार्या अॅक्टिव्हा दुचाकीचालकाचा अचानक ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला पडली. त्याचवेळी कारचालक आपल्या बाजूने वाहन चालवत असताना दुचाकीचालक कारच्या चाकाखाली आल्याचे साक्षीत नमूद करण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही.
भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-अ अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी मृत्यू आणि संशयिताचे निष्काळजी कृत्य यांच्यात थेट संबंध असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. केवळ वाहनाचा वेग जास्त होता, या कारणावरून चालकाला अपघातासाठी दोषी ठरवता येणार नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचालक अचानक पडून कारखाली येईल, अशी अपेक्षा चालकाकडून करता येणार नाही, असेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
अपघाताचे तात्कालिक कारण रस्त्यावरील खड्डा असल्याचे साक्षीतून स्पष्ट होत असल्याने संशयित कार चालकाविरुद्ध खटला सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. त्यानुसार, खटला बंद करण्याचा अर्ज मंजूर करण्यात आला. तसेच संशयिताला पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.


