फोंडा : धारबांदोडा येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री कदंब बसची रस्त्यावर बसलेल्या गुरांना धडक बसून ५ गुरे जागीच दगावली, तर ६ गुरे जखमी झाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले. जखमी गुरांना उपचारासाठी गोशाळेत नेण्यात आले.
धारबांदोडा येथील वन खात्याच्या कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर रात्री सुमारे २ वाजता हा अपघात झाला. हुबळीहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या जीए-०३-एक्स-०७५१ क्रमांकाच्या कदंब बससमोर अचानक रस्त्यावर बसलेली ११ गुरे आली. अंधारामुळे गुरे चालकाला वेळीच दिसली नाहीत.
चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, बसची गुरांना धडक बसल्याने पाच गुरांचा मृत्यू झाला, तर सहा गुरे जखमी झाली. या अपघातात कदंब बसचेही नुकसान झाले आहे.
फोंडा ते मोले या राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने गुरे रस्त्यावर बसलेली असतात. त्याचबरोबर अवजड वाहनेही रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे पार्क केली जातात. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अशा अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरे बसू नयेत तसेच बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
उसगावात ट्रकला कारची धडक; ६ जखमी


