एमपीएच्या जागेतील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्यासाठी जागा निश्चित!

एमपीएकडे सल्लामसलत करून ठरवणार हस्तांतरणाची तारीख

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
01st September, 11:54 pm
एमपीएच्या जागेतील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्यासाठी जागा निश्चित!

पणजी : मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (एमपीए) जमिनीवर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. पुतळा हस्तांतरण करण्याची तारीख एमपीएकडे सल्लामसलत करून ठरविण्यात येणार अाहे, असे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. याची दखल घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी बुधवार २ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
या प्रकरणी ‘एमपीए’ने न्यायालयात मुख्य याचिका दाखल केली होती. प्राधिकरणाच्या जागेत १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मुरगाव पोलीस आणि नगरपालिकेकडे तक्रार देऊनही पुतळा हटवण्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. परिणामी पुतळ्याचे काम पूर्ण होऊन त्याचे अनावरणही करण्यात आले. अखेर प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत प्राधिकरणाने उच्च न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणी मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. पुतळा हस्तांतरण करण्याची तारीख एमपीएकडे सल्लामसलत करून ठरविण्यात येणार असल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयात दिली.
अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, कायद्याचे उल्लंघन करून एमपीएच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या पुतळा उभारल्याचे समोर आले. केवळ प्रेक्षक बनून पुतळा उभारण्यास परवानगी दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. तसेच, पोलिसांनी कारवाई न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत जमिनीवरून पुतळा हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. दरम्यान, सरकारकडून पुतळा हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.                                      

हेही वाचा
सर्व पहा