झाराप-पत्रादेवी बायपास मार्गावरील अपघातग्रस्त दुचाकी.
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपास मार्गावर वेत्ये येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी घडला.
शोभा अॅन्थनी फर्नांडिस (वय २१, रा. मडगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, गोव्यातील एक युवक शोभा हिला दुचाकीवरून आंबोली येथे घेऊन जात होता. प्रवासदरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवरील वेत्ये हद्दीत त्यांच्या दुचाकीची मडुरा येथील युवकांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, शोभा गाडीवरून थेट रस्त्यावर फेकली गेली.
अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शोभा हिची प्राणज्योत मालवली. या अपघातात जखमी झालेल्या तिघांमध्ये एक जण गोव्यातील असून उर्वरित दोघे मडुरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या अपघाताप्रकरणी अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.


