तारक आरोलकरला दोन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
4 hours ago
तारक आरोलकरला दोन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी

म्हापसा : आसगाव येथील ४० लाख रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा शाखेने अटक केलेल्या म्हापसाचा माजी नगरसेवक तारक आरोलकर याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांनी वाढ केली. तर, आरोलकर याच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी म्हापसा न्यायालयाने निश्चित केली आहे.

गुरुवार, दि. २७ रोजी गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरोलकर याला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले. त्याच्या वकिलांनी आपल्या अशिलाची अतिरिक्त कोठडी वाढवण्यास विरोध केला. मात्र, या प्रकरणात पोलीस कोठडीतील चौकशी अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली.

दरम्यान, म्हापसा न्यायालयाने आरोलकर याच्या जामीन अर्जावरही गुरुवारी सुनावणी घेतली आणि तपास अधिकार्‍यांना प्रकरणाच्या कागदपत्रांसह शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्जावर अंशतः युक्तिवाद केला. आता पुढील युक्तिवादासाठी हे प्रकरण शुक्रवारी दुपारच्या सत्रासाठी निश्चित करण्यात आले आहे. या जामीन अर्जाला फिर्यादी पंकज बजाज यांनी विरोध करणारा हस्तक्षेप अर्ज सादर केला आहे.

दरम्यान, फिर्यादी पंकज बजाज (रा. दिल्ली) यांनी याप्रकरणी गुन्हा शाखेमध्ये तक्रार केली होती. हा फसवणुकीचा प्रकार २ नोव्हेंबर २०२२ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला होता. संशयित आरोपी तारक आरोलकर यांनी आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील जमिनीचे मालक व अधिकृत व्यक्ती असल्याचे भासवले व विश्वास संपादन करण्यासाठी जमिनीचा बनावट विक्रीकरारही दाखवला. त्यानंतर जमीन खरेदीची आगाऊ ४० लाख रुपये रक्कम घेऊनही विक्री करारपत्र पूर्ण केले नाही आणि रक्कम परत केली नाही. नंतर सदर जमीन ही जोजफ मारियान डिसोझा उर्फ जुझे एम. डिसोझा यांच्या मालकीची असल्याचे उघड होताच फिर्यादींनी गुन्हा शाखेत १७ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी भा.दं. सं.चे कलम ४२०, ४०६, ४७७, ४६८ व ४७१ अन्वये गुन्हा नोंदवून दि. १९ ऑगस्ट रोजी आरोलकर यांना अटक केली होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक हे करीत आहेत.

जामीन अर्जाला विरोध

तारक आरोलकर यांच्या जामीन अर्जाला फिर्यादी पंकज बजाज यांनी विरोध करणारा हस्तक्षेप अर्ज सादर केला आहे. पंकज बजाज (रा. दिल्ली) यांनी याप्रकरणी गुन्हा शाखेमध्ये तक्रार केली होती.

हेही वाचा
सर्व पहा