पणजी : ७ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार असून अनेक नागरिक यामध्ये फसवले गेले आहेत. या प्रकरणाचा मूळ स्त्रोत, गुन्ह्याची पद्धत आणि पैशांचा मार्ग शोधून काढण्यासाठी संशयिताची कोठडीत चौकशी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य सूत्रधार शिवाजी किशन जाधव याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) या प्रकरणी पुणे येथील सॉईल प्रॉपर्टीज आणि इन्फ्रा इंडिया लि. कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, वरील कंपनीच्या संचालकांनी राज्यातील अनेक गुंतवणूकदारांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून ७ कोटी रुपयांचा गंडा घातला. त्यासाठी कंपनीने २०१४ मध्ये पाटो - पणजी येथे कार्यालय सुरू केले. त्यावेळी कंपनीने गोव्यातील गुंतवणूकदारांना जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून कायम ठेव आणि इतर प्रकारची ठेव योजना सुरू केली. कंपनीने गुंतवणूकदारांना २०१४ ते २०१९ या कालावधीत रक्कम जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर कंपनीने परतावा देण्यास नकार देऊन कार्यालय बंद केले. याची माहिती मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी ईओसीला संपर्क साधला. ईओसीचे अधीक्षक अर्शी आदिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजाशद शेख यांनी वरील कंपनीच्या संचालक व इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याच दरम्यान ईओसीने नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणात आणखीन एक गुन्हा दाखल केला. त्यानुसार, पुणे येथील हरिओम मल्टीस्टेट सहकारी पतपुरवठा सोसायटी लि.चे पुण्यात मुख्यालय असून त्यांनी २०१६ मध्ये गोव्यात पाटो येथे शाखा उघडली. त्यांनी गोव्यातील नागरिकांना जादा व्याजाचे आमिष दाखवून १.६९ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आल्यामुळे गुन्हा दाखल केला. तपास करून ईओसीने वरील कंपनीचे अध्यक्ष तथा मुख्य सूत्रधार शिवाजी जाधव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली. दरम्यान, जाधव याने सॉईल प्रॉपर्टीजने या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यतामुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
सत्र न्यायालयाने फेटाळला होता अर्ज
सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिवाजी जाधव याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेतली असता, अतिरिक्त सरकारी वकील प्रवीण फळदेसाई यांनी युक्तिवाद मांडला. या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून मुख्य सूत्रधार शिवाजी किशन जाधव याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.


