संशयित दुबईत पळून जाण्याची शक्यता असल्याने नाकारला जामीन

सुमारे ३०० जणांना ७.३६ कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
39 mins ago
संशयित दुबईत पळून जाण्याची शक्यता असल्याने नाकारला जामीन

पणजी : राज्यातील सुमारे ३०० जणांना जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ७ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. संशयिताचे दुबईत घर असून तो पळून जाण्याची शक्यता आहे. तसेच मुख्य सूत्रधार फरार असून तो दुबईत असल्याचे तपासात समोर आले आहे, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील सत्र न्यायालयाने पर्वरी येथील आशुतोष नाईक याचा जामीन फेटाळून लावला.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) डिचोली येथील एका महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, २०२० ते २०२५ या कालावधीत पणजी आणि पर्वरी येथे मुख्य संशयित लविश चौधरी उर्फ नवाब अली (रा. मुझफ्फरनगर-उत्तर प्रदेश, सध्या दुबई) याने स्वतःला ‘बोटब्रो क्यूएफएस ट्रेड लिमिटेड’, ‘यार्कर कॅपिटल मार्केट्स’, ‘बोटाल्फा क्रोस मार्केट्स’ आणि ‘माईन क्रिप्टो’ या कंपन्यांचा संस्थापक असल्याचे भासवले. तसेच या प्रकरणात मुख्य संशयितासह संजीव कुमार, ब्रजेश कुमार (दोघेही रा. उत्तर प्रदेश व सध्या दुबई), उदय सिनारी, नीलेश नाईक (दोघेही रा. डिचोली), आशुतोष नाईक (रा. आल्त पर्वरी), सूरज कांदे (रा. मळा पणजी), विजयकांत नार्वेकर, सजेश नार्वेकर आणि विजय नायडू या १० संशयितांचा समावेश आहे. वरील संशयितांनी संबंधित कंपन्यांच्या धोरणांचा प्रचार केला आणि गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन तक्रारदारासह सुमारे ३०० जणांना ७ कोटी ३६ लाख ५७ हजार १६० रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. नंतर ही रक्कम त्यांना परत केली नाही. तक्रारीची दखल घेऊन ईओसीचे पोलीस अधीक्षक अर्शी आदील व उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१४, ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३१९(२), ३२०, ३६(२), ३४०(२), ६१(२) तसेच ‘गोवा ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायदा १९’चे कलम ३ व ५ आणि ‘माहिती तंत्रज्ञान कायदा २००२’चे कलम ६(ड) अंतर्गत गुन्हा नोंद केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास निरीक्षक राझाशद शेख यांच्याकडे वर्ग केला. पर्वरी येथील आशुतोष नाईक या संशयिताला गुरुवारी अटक केली. यानंतर त्याला मेरशी येथील सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयात सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे यांनी युक्तिवाद मांडले. या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयिताचा जामीन फेटाळून लावला.

संशयित न्यायालयीन कोठडीत

पर्वरी येथील आशुतोष नाईक या संशयिताला गुरुवारी अटक केली. अटक केल्यानंतर त्याला मेरशी येथील सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

हेही वाचा
सर्व पहा