स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार; बापाला २० वर्षांचा सश्रम कारावास

१.३० लाखांचा दंड : जुलै २०२४ मध्ये घडली होती घटना

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
25th August, 11:36 pm
स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार; बापाला २० वर्षांचा सश्रम कारावास

पणजी : मुरगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने तिच्या वडिलांना २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.३० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. हा निवाडा विशेष न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी २६ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. पीडितेने हा प्रकार मैत्रिणी आणि शिक्षिकेला सांगितल्यानंतर शिक्षिकेने पोलिसांत तक्रार केली. वेर्णाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मेलसन्स कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस यांनी वडिलाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ आणि ८ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. पोलिसांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्यांची दखल घेऊन आरोप निश्चित करून खटला सुरू केला. संशयिताने अनेक वेळा दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे आणि शिल्पा नागवेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पीडित मुलगी, तिची शिक्षिका आणि मैत्रिणींच्या साक्षी या प्रकरणात महत्त्वाच्या ठरल्या. या संदर्भात पाॅक्सो न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर २३ ऑगस्ट रोजी आरोपीला दोषी ठरविले होते. त्यानंतर शिक्षेवर झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली.
आरोपीला विविध कलमांखाली शिक्षा
भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड, पॉक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत १० वर्षांचा कारावास व २० हजार रुपये दंड, कलम ६ अंतर्गत २० वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंड आणि कलम ८ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास अतिरिक्त साधी कैद सुनावण्यात आली आहे.      

हेही वाचा
सर्व पहा