खुटवळ येथील सुपुत्र तथा प्रतिभावान गायक विश्वजित विश्वास मेस्त्री सध्या मुंबईत संगीत क्षेत्रातील आपल्या कलेचा ठसा उमटवत असून झी मराठीवरील ‘सारेगमप’ या संगीत कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याला या कार्यक्रमात ‘क्लासिकल किंग’ ही उपाधी देण्यात आली आहे. २२ ऑगस्टपासून दर शनिवारी व रविवारी रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम झी मराठीवर प्रसारित होत आहे. त्यामुळे पेडणेच्या संगीत क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उत्तर गोव्यातील खुटवळ येथील विश्वजित मेस्त्री याने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडील तथा गुरु विश्वास मेस्त्री यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक धडे घेतले. गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण साधनेतून त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तिगीत, नाट्यगीत तसेच सुगम संगीतावर प्रभुत्व मिळविले आहे.
युवा कलाकार विश्वास मेस्त्री हे तबला व हार्मोनियम वादनातही पारंगत असल्याने विश्वजित यांना गायना सोबतच या दोन्ही वाद्यांचेही प्रशिक्षण मिळाले आहे. त्यांनी विविध शास्त्रीय व सुगम संगीत कार्यक्रम तसेच संगीत नाटकांमध्ये कलाकारांना तबला आणि हार्मोनियमची साथसंगतही केली आहे.
संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात जन्मलेल्या विश्वजित यांनी गोव्यातील ‘कट्यार काळजात घुसली’ ‘संगीत सम्राटशाही’ यांसारख्या संगीत नाटकांमध्ये काम केले आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली १६ वर्षे संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातून २०१६ मध्ये गायन विषयातील विशारद पूर्ण केले आहे.
सेंट झेवियर्स कॉलेज, गोवा येथून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी पुण्याची वाट धरली. पुण्यातील आवर्तन गुरुकुलमध्ये पं. उल्हास कशाळकर यांच्याकडून सुमारे तीन वर्षे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. त्याच गुरुकुलमध्ये पं. रामदास पळसुले यांच्याकडून तबला वादनाचेही प्रशिक्षण घेतले.
२०१८ पासून त्यांनी ज्येष्ठ गायक पं. शौनक अभिषेकी यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेत हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे शिक्षण सुरू केले. ते आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत साधना करत असून गुरूंसोबत देश विदेशातील विविध प्रतिष्ठित संगीत कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.
विविध प्रतिष्ठित कार्यक्रमांत सहभाग
विश्वजित मेस्त्री यांनी २०१८ मध्ये पुण्यातील पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात सादरीकरण केले. तसेच दर्पण युवा संगीत महोत्सव, गोवा; ‘गुरु नमन’, पुणे; ‘कला रम्या’, गोवा यांसह विविध संगीत कार्यक्रमांत सहभाग नोंदविला आहे.
सुरंजन ट्रस्ट आयोजित संगीत स्पर्धेत २०२१ मध्ये त्यांनी विजेतेपद मिळविले. २०१९ मध्ये त्यांना प्रतिष्ठेची ज्योत्स्ना भोळे शिष्यवृत्ती प्राप्त झाली. ‘नक्षत्रांचे देणे – पु. ल. देशपांडे’ या झी मराठी कार्यक्रमात तसेच संगीत नाटक अकादमी आयोजित ‘अमृत युवा कलोत्सव’ मध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.
परीक्षकांची मिळविली शाबासकी
झी मराठीच्या ‘सारेगमप’ कार्यक्रमात विश्वजीतने आपल्या घरंदाज गायकीचा नजराणा पेश करून परीक्षकांची शाबासकी मिळविली. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी विश्वजीतच्या गायकचे भरभरून कौतुक केले आहे.


