पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे साखळी, डिचोली, प्रियोळसह १२ मतदारसंघांत निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले जाणार आहे. फोंडा मतदारसंघातील सर्वेक्षण पूर्ण होऊन मगो पहिल्या स्थानावर आहे. इतर मतदारसंघांतील निकाल चतुर्थींनंतर येतील, असे वीजमंत्री व मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
फोंडा मतदारसंघात गुंडगिरी, दादागिरी व कामासाठी कमिशन घेण्याचे प्रकार चालत असल्याची माहिती सर्वेक्षणातून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बैठकांसह केंद्रीय नेत्यांच्या भेटीमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मगो पक्षाने सर्वेक्षणास सुरवात केली आहे. यामुळे मगो पक्ष निवडणुकीसाठी १२ मतदारसंघांवर दावा करण्याची शक्यता आहे.
भाजपबरोबर आमची युती आहे. युती धर्माचे पालन करूनच मगोचे कार्य सुरू आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणाचे काम पक्षाने हाती घेतले आहे. फोंड्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. फोंड्यात मगो पक्ष सर्वात पुढे आहे. इतर मतदारसंघांतील स्थिती सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कळेल, असे ढवळीकर म्हणाले.
फोंड्यात दादागिरी, गुंडगिरी
फोंड्यातील सर्वेक्षणाची माहिती देताना सुदीन ढवळीकर म्हणाले, फोंड्यात दादागिरी, गुंडगिरी व कामासाठी कमिशन घेण्याचे प्रकार सुरू आहेत. सर्वेक्षण करताना लोकांकडूनच ही माहिती मिळाली. एखादे काम लवकर पूर्ण होण्यासाठी कमिशन द्यावे लागते. फोंडा नगरपालिकेत विविध कामांसाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागतात. प्रकल्पांची कामे प्रलंबित आहेत. असे प्रकार सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. मगोने पुढे येऊन काही तरी करावे, अशी लोकांची मागणी असल्याचे त्यानी सांगितले.
साखळी मगोचा बालेकिल्ला
साखळी म्हणजे पूर्वीचा पाळी मतदारसंघ हा मगोचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आजही साखळीत मगोची ताकद आहे. साखळी, डिचोलीत सर्वेक्षण केले जाईल, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
ऑक्टोबरनंतर वीज बिले सुरळीत
वीज ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले येत आहेत. ज्यांनी लोड वाढविलेला आहे, त्यांच्या विजेच्या दरात आवश्यक तो बदल करावा लागणार आहे. यासाठी तीन महिने लागतील. ऑक्टोबरनंतर वीज बिले सुरळीतपणे येण्यास सुरवात होईल, असे वाढीव बिलांबाबत बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.


