एसआयआरद्वारे गोव्यात मत चोरीचा प्रयत्न : काँग्रेसचा आरोप

राज्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) केल्यानंतर विरोधी पक्षाच्या मतदारांचे नाव जाणीवपूर्वक काढून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. पणजीत अस्तित्वात नसलेल्या इमारतीमधील मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यात आली आहेत. एसआयआरद्वारे भाजप मत चोरीचा प्रयत्न करत आहे. याबाबत आम्ही संबंधित बीएलओंवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी सांगितले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
44 mins ago
एसआयआरद्वारे गोव्यात मत चोरीचा प्रयत्न : काँग्रेसचा आरोप

पणजी: राज्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर)  केल्यानंतर विरोधी पक्षाच्या मतदारांचे नाव जाणीवपूर्वक काढून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. पणजीत अस्तित्वात नसलेल्या इमारतीमधील मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यात आली आहेत. एसआयआरद्वारे भाजप मत चोरीचा प्रयत्न करत आहे. याबाबत आम्ही संबंधित बीएलओंवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी सांगितले.

मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अमित पालेकर व लिओनेल फुर्तादो व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कवठणकर यांनी सांगितले की, एसआयआर नंतर आम्ही या प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू केली आहे.  आमचे कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघात फिरून माहिती घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पणजी मधील प्रभाग १०, १६ आणि १८ मध्ये या प्रक्रियेत अनेक विसंगती आहेत. आल्तीनो येथील सरकारी क्वार्टर इमारत पाडून सहा वर्षे झाली. येथील सर्व रहिवासी अन्यत्र राहण्यास गेले आहेत. तरी देखील येथील सुमारे २५० मतदारांची नावे अद्याप मतदार यादीत आहेत. त्याचप्रमाणे रायबंदर येथेही सध्या तिथे न राहणाऱ्या मतदारांची नावे अद्याप कायम आहेत. 

ते म्हणाले, काही ठिकाणी विरोधी पक्षाला समर्थन करणाऱ्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक काढण्यात आली आहेत. बीएलओंनी कायद्यानुसार काम करणे अपेक्षित आहे. आमदार मंत्री अथवा एखादा पक्ष दबाव टाकतो म्हणून नियम तोडू नयेत. अशा संशयास्पद बीएलोंविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. लोकशाहीचा गाभा मतदानाचा अधिकार आहे. त्यावर कोणी घाला घालत असेल तर आम्ही ते सहन करून घेणार नाही. याबाबत काँग्रेसने एक हेल्पलाईन सुरू केली आहे. आपले नाव चुकीच्या पद्धतीने काढले गेले असे वाटल्यास मतदारांनी आम्हाला संपर्क करावा. 

सांताक्रूझ मतदारसंघात ४७०० मते वगळली 

अमित पालेकर म्हणाले की, एसआयआरनंतर  सांताक्रूझ मतदार संघातून सुमारे ४७०० नावे वगळण्यात आली आहेत. यातील बहुतेक मतदार हे अल्पसंख्यांक आहेत. ते अद्यापही तिथेच राहतात. चुकीच्या पद्धतीने नाव काढल्या बाबत आम्ही बीएलोविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच त्यांची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत.

हेही वाचा
सर्व पहा