सारझोरा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


24th August, 11:08 pm
सारझोरा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातग्रस्त कार आणि दुचाकी.
गोवन वार्ता। प्रतिनिधी
मडगाव : सारझोरा येथे सोमवारी सकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीचालक सिकंदर हंडोलना (४२) यांचा मृत्यू झाला. ते मूळचे ओडिशा येथील असून सध्या दांडेवाडा चिंचणी येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर इलेक्ट्रिक दुचाकीवरून जात असताना समोरून येणार्‍या अल्टो कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी इस्पितळात नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्टो कारचालक स्वतंत्रकुमार चौहान (मूळ उत्तर प्रदेश) याच्याविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सिकंदर रोजंदारीवर काम करत होते व कामासाठी घराबाहेर पडलेले असताना हा अपघात झाला. पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदिन भोसले पुढील तपास करत आहेत.
रुग्णवाहिका येण्यास विलंब; स्थानिकांत संताप
अपघातानंतर तत्काळ रुग्णवाहिका येण्याची गरज आहे. मात्र, बराच काळ झाला तरीही रुग्णवाहिका आली नाही. १०८ रुग्णवाहिकावरील चालकांना लोकेशन पाठवूनही त्यांना कोणत्या ठिकाणी जायचे ते समजत नाही, हा गंभीर विषय आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. अपघातग्रस्त व्यक्तीच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.             

हेही वाचा
सर्व पहा