मांद्रेत घरात घुसून महिला, अल्पवयीन मुलाला मारहाण

मालमत्तेच्या वादातून प्रकार : मांद्रे पोलिसांकडून तपास सुरू

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
24th August, 11:39 pm
मांद्रेत घरात घुसून महिला, अल्पवयीन मुलाला मारहाण

पेडणे : मालमत्तेच्या वादातून बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसत महिला आणि तिच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा प्रकार मांद्रे येथे समोर आला आहे. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिलेला शिवीगाळ व मारहाण करण्यासह तिच्या मोबाईलची मोडतोड करून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केल्याचा तसेच महिला व तिच्या अल्पवयीन मुलाला खोलीत कोंडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुचिता म्हामल, तिचा भाऊ मांगीश चोडणकर (रा. तार-शिवोली), सुचिताची मुलगी, सुचिताची बहीण किशोरी व तिचा पती किशोर (दोघेही रा. शिवोली), मनीषा हरमलकर (रा. मधलामाज-मांद्रे) यांच्यासह दोन अनोळखी महिला आणि एका अनोळखी पुरुषाचा आरोपी म्हणून उल्लेख आहे.
मांद्रे पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी गुन्हा क्रमांक ८१/२०२६ नोंदवला. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह गोवा चिल्ड्रन्स अॅक्ट २००३ मधील कलम ८ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मांद्रे पोलीस करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा