म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील संशयित जीएचआरडीसी सुरक्षारक्षक आशा चोडणकर हिची म्हापसा न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली आहे. तर या प्रकरणातील कैदी रोविना लोबो हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
रोविना लोबो हिच्या जबानीतून अमली पदार्थ तस्करीमध्ये आणखी काही कैद्यांचा सहभाग असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कैद्यांना अटक करण्यासाठी कोलवाळ पोलिसांनी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.
दरम्यान, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.१० वाजता हा प्रकार उघडकीस आला. कर्तव्यावर येण्यासाठी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचलेल्या आशा चोडणकर हिची फ्रिस्किंग पॉईंटवर आयआरबी जवानांनी तपासणी केली. तिच्या थर्मासमध्ये २३६ ग्रॅम गांजा आणि २ ग्रॅम चरस, असा सुमारे ३० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ सापडला. तिच्या लॉकरमधून तीन मोबाईल आणि तीन एटीएम कार्डही जप्त करण्यात आले.
कारागृह अधीक्षक सुचिता देसाई यांच्या तक्रारीवरून कोलवाळ पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम २०(ब)(२)(अ) आणि भारतीय तुरुंग कायद्याच्या कलम ४२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी आशाला अटक करण्यात आली. चौकशीत रोविना लोबोचा संबंध समोर आल्यानंतर तिलाही २२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश घाडी करीत आहेत.
आशाला जामीन; रोविनाची कारागृहात रवानगी
आशा चोडणकर हिचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने २५ हजार रुपयांची हमी रक्कम आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याचे आदेश दिले. तसेच १५ दिवस सकाळच्या वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासह अन्य अटी घालण्यात आल्या आहेत. तर रोविना लोबो हिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी तिची पुन्हा कोलवाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.


