अपघाती मृत्यूप्रकरणी सरकारी कर्मचार्‍याच्या कुटुंबाला ५३.४२ लाखांची भरपाई

मडगाव मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचा निकाल

Story: गोवन वार्ता।प्रतिनिधी |
23rd August, 11:38 pm
अपघाती मृत्यूप्रकरणी सरकारी कर्मचार्‍याच्या कुटुंबाला ५३.४२ लाखांची भरपाई

मडगाव : राज्य सरकारच्या जलसंसाधन खात्यात साहाय्यक मिस्त्री म्हणून कार्यरत असलेल्या ज्युलिओ फेर्रांव यांचा अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी मडगाव मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने त्यांच्या कुटुंबाला ५३ लाख ४२ हजार ९०० रुपये नुकसानभरपाई मंजूर केली आहे. अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ६.८० टक्के वार्षिक व्याजासह ही रक्कम देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
मार्च २०२३ मध्ये फुर्तादो पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला होता. ज्युलिओ फेर्रांव हे अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने कुंकळ्ळीहून मडगावच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या ब्रिझा कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या फेर्रांव यांचा १ एप्रिल २०२३ रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणाची सुनावणी मडगाव मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे न्या. राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात झाली. अपघातावेळी कार हरी उन्नीकृष्णन (बंगळुरू, कर्नाटक) चालवत होते. तेच कारचे मालक असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट झाले.
दरम्यान, फेर्रांव यांचे मासिक उत्पन्न ५१ हजार रुपये होते. त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या पत्नी माग्दालिना परेरा (५०), मुलगा रेमंड (२०) आणि मुलगी रिझ्मा (१७) यांच्या भवितव्याचा विचार करून न्यायाधिकरणाने ५३,४२,९०० रुपयांची भरपाई निश्चित केली.
हरी उन्नीकृष्णन आणि इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी संयुक्तपणे ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बँक खात्यात एनईएफटीद्वारे जमा करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
निष्काळजीपणा पुराव्यांतून सिद्ध
तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल घनश्याम गावकर यांनी सादर केलेले पंचनामे आणि अपघाताचा नकाशा यावरून कारचालकाचा निष्काळजीपणा सिद्ध झाल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले. कारचालक तसेच इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या पुराव्यांचे खंडन करण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत न्यायाधिकरणाने फेर्रांव यांच्या कुटुंबाचा दावा मंजूर केला.            

हेही वाचा
सर्व पहा