नळातून खाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यावर कोरगाव ग्रामस्थांत संताप

उपाययोजना करण्याची ग्रामसभेत मागणी : रस्ते, गटार, कचरा, विकासकामांवर चर्चा

Story: गोवन वार्ता। वार्ताहर |
23rd August, 11:46 pm
नळातून खाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यावर कोरगाव ग्रामस्थांत संताप

कोरगाव : भालखाजन-माईण मानशी परिसरात नळाला येणाऱ्या खाऱ्या पाण्याचा प्रश्न कोरगाव ग्रामसभेत चांगलाच तापला. नागरिकांना खाऱ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने पंचायत व संबंधित शासकीय यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थ राहुल भगत यांनी खाऱ्या पाण्याचा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित केला. मानवाधिकार विभागानेही या विषयाची दखल घेतल्याचे सांगत त्यांनी पंचायत प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले. या विषयावर चर्चा सुरू असताना काहींनी मुद्दा अन्य दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांना योग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, तसेच संबंधित विभागाकडे याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा होत असल्यास त्याचीही तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. वर्षा देसाई यांनीही खाऱ्या पाण्याच्या प्रश्नाची पंचायतीने गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी आणि नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.

सरपंच कल्पिता कलशावकर यांनी पंचायत प्रशासनाने यापूर्वीच पाणी विभागाला याबाबत कळविले असून संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून तपासणी केल्याची माहिती दिली. खाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पंचायत प्रयत्नशील असून लवकरच यावर योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन ग्रामसभेला दिले.

ग्रामसभेत रस्त्यांवरील खड्डे, कचरा, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंधित विविध विषयांवरही चर्चा झाली. राहुल भगत यांनी यापूर्वी पंचायतकडे दाखल केलेल्या तक्रारींचा संदर्भ देत, पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना माळरानात बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीबाबत जलस्रोत खात्याने दिलेल्या अहवालावर पंचायत प्रशासनाने अद्याप कोणती कारवाई केली, असा सवाल केला.

सरपंच कल्पिता कलशावकर यांनी संबंधित जागेवर संरक्षक भिंत बांधण्यासाठी पंचायतीने यापूर्वी ना हरकत दाखला दिल्याचे स्पष्ट केले.

सुदीप कोरगावकर यांनी पंचायत सभागृहाच्या नूतनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. नूतनीकरणासाठी वापरण्यात आलेले जुने साहित्य कुठे गेले, तसेच सभागृहाचे काही काम अद्याप अर्धवट का आहे, असा सवाल त्यांनी केला. रंगकामासह उर्वरित काम पूर्ण करून घेण्यात येईल, असे सरपंच कल्पिता कलशंकर यांनी आश्वासन दिले.

ग्रामसभा सरपंच कल्पिता कलशावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसरपंच दिवाकर जाधव, पंचायत सदस्य अब्दुल करीम नाईक, देविदास नागवेकर, उमेश च्यारी, लौकिक शेट्ये, समीर भाटलेकर, नीता नर्से, अनुराधा कोरगावकर, लौकिक शेट्ये तसेच पंचायत सचिव अविनाश पाळणी उपास्थित होते.

गटाराच्या प्रश्नावरही ग्रामसभा गाजली

गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्याचा मुद्दा रोहिदास भाटलेकर यांनी उपस्थित केला. रस्त्यालगत असलेल्या इमारतीच्या बाजूने खोदण्यात आलेले गटार काही ठिकाणी अर्धवट असून काही ठिकाणी अडवण्यात आल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत सचिवांनी संबंधित इमारत आणि गटाराच्या प्रश्नाबाबत पंचायत प्रशासन नियमानुसार काम करत असल्याचे स्पष्ट केले. 

हेही वाचा
सर्व पहा