ई २० पेट्रोलला विरोध; अरविंद केजरीवाल २५ रोजी गोव्यात

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
16 mins ago
ई २० पेट्रोलला विरोध; अरविंद केजरीवाल २५ रोजी गोव्यात

पणजी : केंद्र सरकारने सक्तीने सुरू केलेल्या ई २० पेट्रोलच्या विरोधात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची गोव्यात टाऊन हॉल सभा होणार आहे. मंगळवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता पणजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये ही सभा आयोजित केली जाणार आहे. गोमंतकीयांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. 

याआधी १ ऑगस्ट रोजी अशीच टाऊन हॉल सभा दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. गोव्यातील अनेक लोकांनी ही सभा ऑनलाईन पद्धतीने पाहिली होती. यावेळी अशीच सभा गोव्यात घेण्याची विनंती कॉमेंट्स द्वारे करण्यात आली होती.  केजरीवाल यांनी याविषयी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशाला अशाच प्रतिक्रिया आल्या होत्या. यानंतर पक्षाने टाऊन हॉल सभा गोव्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी केजरीवाल यांनी पणजी मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप हटाओ, गाडी बचाओ असा नारा दिला होता. बहुतांश वाहने ई २० इंधनसाठी सुसंगत नसतानाही भाजप सरकार जनतेवर असे पेट्रोल लादत आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या इथेनॉलसाठी भारतात बाजारपेठ निर्माण करण्याच्या दबावाखाली हे धोरण राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ई २० पेट्रोल सक्तीमुळे गोव्यातील जवळपास ९० टक्के कुटुंबे थेट प्रभावित होणार आहेत असा दावा त्यांनी केला होता.

२०२३ पूर्वी उत्पादित झालेली जवळपास ३० कोटी वाहने ई २० साठी सुसंगत नाहीत. सरकारने पुरेशी तयारी न करता संपूर्ण देशात ई २० पेट्रोल लागू केले असून त्याचा परिणाम वाहनमालकांना भोगावा लागत आहे. अशा पेट्रोल मुळे. दुचाकींच्या मायलेजमध्ये २५–३० टक्क्यांपर्यंत घट, इंजिनचे नुकसान, इंजिन बंद पडणे, इंधन प्रणालीमध्ये गंज येणे तसेच महागड्या दुरुस्तीचा खर्च वाहनमालकांना सहन करावा लागत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता.

हेही वाचा
सर्व पहा