पक्षांतर करणाऱ्या नेत्यांसाठी गोवा फॉरवर्डचे दरवाजे कायमचे बंद : विजय सरदेसाई

माजी मंत्री जयेश साळगांवकर यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी टीका केली. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांसाठी पक्षाचे दरवाजे कायमचे बंद असल्याचे सांगत त्यांनी भाजपला सक्षम पर्याय देणार असल्याचे स्पष्ट केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
पक्षांतर करणाऱ्या नेत्यांसाठी गोवा फॉरवर्डचे दरवाजे कायमचे बंद : विजय सरदेसाई

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पक्षाचे माजी नेते व माजी मंत्री जयेश साळगांवकर यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या ऑफरबाबत केलेल्या दाव्याचा समाचार घेत गोव्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा घडवून आणली आहे. सरदेसाई यांनी, साळगांवकरांच्या पक्षांतरामुळे निर्माण झालेल्या तत्कालीन परिस्थितीचा आणि त्यामागील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. साळगांवकर यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचे सांगितले होते; मात्र, आपल्यासोबत इतर सहकाऱ्यांना एकत्र आणण्यात अपयश आल्याने आणि आवश्यक संख्याबळाची अट पूर्ण न झाल्यामुळे ती ऑफर प्रत्यक्षात येऊ शकली नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

पक्षांतराच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेत सरदेसाई यांनी 'गोवा फॉरवर्ड' हा काही रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा आगरशाळा नाही, जिथे कोणीही आपल्या सोयीनुसार यावे आणि निघून जावे, असा टोला लगावला. राजकीय पक्षात शिस्त आणि निष्ठा या अत्यंत महत्त्वाच्या बाबी असतात. त्यामुळे पक्षाला सोडून गेलेल्या आणि पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांसाठी गोवा फॉरवर्डचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. साळगांवकर यांना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विश्वासावर पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली होती, ज्याच्या जोरावर ते आमदार आणि मंत्री पदापर्यंत पोहोचले. मात्र, त्यांनी दिलेली आश्वासने मोडून पक्षाशी विश्वासघात केला, अशी टीकाही त्यांनी केली.

गोव्यातील राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेले पक्षांतराचे राजकारण हे गोव्याची ओळख, संस्कृती आणि परंपरेला धक्का पोहोचवणारे आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये गोव्यातील जनता अशा पक्षांतराच्या मॉडेलविरोधात आपला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या गोवा फॉरवर्ड पक्ष हा भारतीय जनता पक्ष आणि पक्षांतराच्या राजकारणाला एक सक्षम, निष्ठावंत आणि विश्वासार्ह पर्याय देण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. विविध मतदारसंघांमध्ये थेट लोकांशी संवाद साधून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरू असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने पूर्ण तयारी सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा
सर्व पहा