पणजी: भारतभ्रमणावर (All-India Motorcycle Expedition) निघालेल्या एका बाईकर्सच्या गटाचे लाखो रुपयांचे साहित्य पणजीमधील एका पे-पार्किंग स्थळावरून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तीन महागडे हेल्मेट्स, गो-प्रो कॅमेरे (GoPro) आणि संवादासाठी वापरण्यात येणारे इंटरकॉम सिस्टीम (Intercoms) चोरीस गेले असून पर्यटकांवर बिकट प्रसंग ओढावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशाटनावर निघालेला बाईकर्सचा परवा २० ऑगस्ट रोजी कर्नाटकमधून हा गट गोव्यात आला होता. क्रूझ पार्टीला (Cruise Party) जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या दुचाकी पे-पार्किंग क्षेत्रात सुरक्षितपणे पार्क केल्या होत्या. मात्र, पार्टीवरून परतल्यानंतर त्यांच्या दुचाकींवरील तीन महागडे हेल्मेट्स आणि त्यासोबत जोडलेले गोप्रो कॅमेरे व कम्युनिकेशन इंटरकॉम गायब असल्याचे निदर्शनास आले.
साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात येताच या गटाने तातडीने पणजी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, चोरीला गेलेल्या साहित्याचा शोध घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन पर्यटकांना दिले आहे.
सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'पे-पार्किंग' भागातूनच पर्यटकांच्या महागड्या साहित्याची चोरी झाल्याने स्थानिक पार्किंग व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.


