जेलमधील ड्रग्स तस्करी डबल मर्डरची आरोपी रोविना लोबोसाठी

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अमली पदार्थ तस्करी प्रकरणात संशयित सुरक्षारक्षक आशा चोडणकर हिच्या चौकशीनंतर महिला कैदी रोविना लोबो हिला पोलिसांनी अटक केली आहे. कोण आहे ही रोविना लोबो ? वाचा सविस्तर.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
15 mins ago
जेलमधील ड्रग्स तस्करी डबल मर्डरची आरोपी रोविना लोबोसाठी

पणजी : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात उघडकीस आलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणात कोलवाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत महिला कैदी रोविना लोबो हिला अधिकृतपणे अटक केली आहे. गोवा मानव संसाधन विकास महामंडळाची (जीएचआरडीसी) संशयित सुरक्षारक्षक आशा रेवानंद चोडणकर हिने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आणि आतील बेकायदेशीर कारवायांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

थर्मासमधून गांजा आणि चरस तस्करी

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रतिबंधित वस्तूंची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर जीएचआरडीसी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून विशेष पाळत ठेवली जात होती. मंगळवारी सकाळी सुमारे ८.१० वाजताच्या सुमारास जीएचआरडीसीची सुरक्षा रक्षक आशा चोडणकर ही नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर होण्यासाठी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचली. त्यावेळी फ्रिस्कींग पॉईंटवर तैनात असलेल्या आयआरबी (IRB) जवानांना तिच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. जवानांनी तिची कसून तपासणी केली असता तिच्याकडे असलेल्या दोन थर्मासच्या तळाशी अत्यंत हुशारीने लपवून ठेवलेला ६५० ग्रॅम गांजा आणि २ ग्रॅम चरस असा एकूण सुमारे ३० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच तिच्याकडून दोन मोबाईल फोन देखील ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आशा चोडणकर हिच्या लॉकरची तपासणी केली असता तेथे आणखी तीन मोबाईल फोन आणि तीन एटीएम कार्ड आढळले. कारागृह अधीक्षक सुचिता देसाई यांनी याप्रकरणी कोलवाळ पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवल्यानंतर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल करून आशा चोडणकर हिला अटक करण्यात आली. म्हापसा न्यायालयाने संशयित आशा हिला सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित सुरक्षारक्षकाला निलंबित करून चौकशीअंती बडतर्फ केले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच कारागृहातील अमली पदार्थांची तस्करी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.

पोलीस तपासादरम्यान आशा चोडणकर हिने हा गांजा आणि चरस कारागृहातील महिला विभागात शिक्षा भोगत असलेल्या रोविना लोबो या कैद्याला देण्यासाठी आणल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी तात्काळ पावले उचलत रोविना लोबो हिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली व या तस्करी प्रकरणात तिचा थेट सहभाग निष्पन्न झाल्याने तिला अटक केली. रोविना लोबो हिचा कारागृहातील या अमली पदार्थ रॅकेटमध्ये नेमका काय रोल होता आणि ती हे अमली पदार्थ स्वतःसाठी मागवत होती की इतर कैद्यांना पुरवण्यासाठी, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.

कोण आहे रोविना लोबो ? 

दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेली रोविना लोबो ही दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी आहे. १६ नोव्हेंबर २०२० रोजी शिवोली येथील इंग्रजवाडा-मार्ना परिसरात घडलेल्या भीषण हत्याकांडात तिचा सहभाग होता. रोविना लोबो (२९) ही तिचा पती ज्युलिओ लोबो आणि दोन लहान मुलांसह पतीच्या दोन अविवाहित आत्या - मार्ता क्लेमिंटीना लोबो (६४) व वेरा लोबो (६२) यांच्यासोबत राहत होती. गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद, मालमत्तेचे भांडण आणि पतीचा दारूच्या नशेत होणारा छळ यामुळे रोविना प्रचंड त्रस्त होती. पती तिच्या माहेरून मिळणारे महिन्याचे ३० हजार रुपये भाडे हिसकावून जुगारात उडवत असे.

या सततच्या कौटुंबिक जाचाला कंटाळून रोविनाने पतीसह दोन्ही आते सासूंचा काटा काढण्याचा कट रचला. या कामासाठी तिने ३० हजार रुपयांचे आमिष दाखवून आसगाव येथे राहणाऱ्या सुभान नूर अहमद राज्याबल्ली (२०, मूळ कर्नाटक) या  साथीदाराला राजी केले. घटनेच्या दिवशी पतीने दारू पिण्यासाठी बाहेर पडल्यानंतर रोविनाने घराचा वीजपुरवठा खंडित केला. अंधाराचा फायदा घेत तिने आणि तिच्या साथीदाराने पूर्वग्रहित कटाप्रमाणे दोन्ही वृद्ध आते सासूंवर बाजारातून नव्याने आणलेल्या धारदार कोयत्याने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून केला. हा रक्ताळलेला प्रकार तिच्या लहान मुलांसमोर घडला.

यावेळी घाबरलेल्या ७ वर्षांच्या मुलीने आरडाओरडा करत शेजाऱ्यांकडे धाव घेतली, ज्यामुळे भांडाफोड झाल्याचे लक्षात येताच रोविनाने साथीदारासह तेथून पळ काढला होता. हणजूण पोलिसांनी अवघ्या काही तासांत आसगाव येथून दोघांना अटक केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून रोविना ही कोलवाळ तुरुंगात न्यायप्रविष्ट बंदी म्हणून राहत आहे. मार्च २०२६ मध्ये तिला दुहेरी खून प्रकरणात जामीन नाकारण्यात आला होता.  आता तुरुंगात असतानाही अमली पदार्थ तस्करीत नाव आल्याने तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.


हेही वाचा
सर्व पहा