गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : श्रावण तसेच गणेश चतुर्थीच्या तोंडावर नारळाच्या दरात वाढ झाली होती. आता तांदूळ, खाद्यतेल आणि साखरेच्या दरातदेखील मोठी वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या चतुर्थीमध्ये सामन्यांच्या खिशाला मोठीच कात्री लागणार आहे. मागील पंधरा दिवसांत साखरेचे दर १५ रुपयांनी वाढून ५५ ते ६० रुपये किलो झाले आहेत. तांदळाच्या दरात प्रतिकिलो मागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे दर २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. आवक कमी असणे, वाढलेल्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा पुरेसा नसणे व अन्य कारणांमुळे दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चे सावट आहे. ‘एल निनो’ काळात पावसाचे प्रमाण कमी होते. यामुळे पुढील हंगामातदेखील तांदुळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांतून होणारी तांदळाची आवक कमी झाली आहे. याशिवाय सणासुदीच्या दिवसांत साखर, तेल व अन्य किराणा मालाची मागणी वाढत असते. मात्र त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने देखील दरवाढ होते. सध्याची दरवाढ पुढील तीन महिने कायम राहण्याची शक्यता आहे. इथेलॉन निर्मितीसाठी वापर वाढल्यानेदेखील साखरेचे दर वाढले असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मागील काही महिन्यांपासून इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन दरवाढ झाली आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढून अन्य वस्तूदेखील खर्चिक झाल्या आहेत. पणजी बाजारात सोनामसुरी तांदळाचे दर ५५ रुपयांवरून ७० रुपये किलो झाले आहेत. जीरा तांदूळ ७० रुपयांवरून ८० रुपये किलो झाला आहे. ऐश्वर्या तांदूळ ७५ वरून ८० रुपये, किशोर तांदूळ ६० वरून ७० रुपये झाला आहे. याशिवाय सोयाबिन तेलाची किंमत दर्जानुसार १८० ते २२० रुपये लिटर झाली आहे. दरवाढ झाली तरी या गोष्टी गोष्टींना मागणी असल्याने खरेदी कमी झालेली नाही. रोजच्या स्वयंपाकात या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यांचा दर वाढल्याने घराचे महिन्याचे ‘बजेट’ कोलमडणार आहे.
भाज्यांच्या दरातही वाढ
दरम्यान, चतुर्थीच्या तोंडावर पणजी बाजारात भाज्यांच्या दरातदेखील वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने पणजी बाजारात नारळाचे दर १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. बाजारात लहान नारळ ४० रुपये, मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये, तर मोठा नारळ ६० ते ७० रुपये नग आहे. बाजारात वालपापडीचे दर दर्जानुसार ८० ते १२० रुपये किलो आहेत. रोजच्या स्वयंपाकातील कांदे आणि बटाटे ५० रुपये किलो आहेत. मिरची आणि ढब्बू मिरची प्रत्येकी १०० रुपये किलो आहेत. भेंडी, गवारी, वांगी, गाजर, कारले आणि बीट प्रत्येकी ८० रुपये किलो आहेत. तर दोडका १०० रुपये किलो आहे.
सणासुदीत महागाईमुळे बजेट कोलमडणार
सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे. भाजीपाला, फळे, कडधान्ये, खाद्यतेल, साखर, मसाले यांसह किराणा मालाच्या दरांत वाढ झाली आहे. सणांसाठी होणारी खरेदी, पाहुणचार आणि घरगुती खर्च यामुळे आधीच वाढलेले बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्याने काही वस्तूंचे दर आणखी वाढण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सणाचा उत्साह कायम ठेवताना खर्चाचे गणित जुळविण्याचे आव्हान ग्राहकांसमोर उभे राहिले आहे. महागाईचा हा तडाखा सणासुदीच्या खरेदीवरही परिणाम करण्याची शक्यता आहे.


