त्रिशा-गायत्री जोडीची ऐतिहासिक भरारी

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा: महिला दुहेरीत १५ वर्षांनंतर भारताचे पदक निश्चित

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
21st August, 11:34 pm
त्रिशा-गायत्री जोडीची ऐतिहासिक भरारी

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या युवा जोडीने इतिहास रचला आहे. महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या जिया यी फान आणि झांग शु शियान या बलाढ्य जोडीचा १६-२१, २१-१५, २१-१३ अशा तीन गेमच्या थरारक लढतीत पराभव करत त्रिशा-गायत्रीने उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयासह महिला दुहेरीत तब्बल १५ वर्षांनंतर भारताचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.
या स्पर्धेच्या नियमांनुसार उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या खेळाडू वा जोडीला थेट कांस्यपदक दिले जाते; तिसऱ्या स्थानासाठी स्वतंत्र लढत होत नाही. यापूर्वी २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते.
सामन्याची सुरुवात अत्यंत वेगवान करत चिनी जोडीने ४-० अशी आघाडी घेतली. भारतीय जोडीने अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु जिया आणि झांग यांनी पहिला गेम २१-१६ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये त्रिशा आणि गायत्रीने रणनीती बदलून उत्कृष्ट बचाव, वेगवान स्मॅशेस आणि नेटवर आक्रमक खेळ दाखवला. चुरशीच्या लढतीनंतर हा गेम २१-१५ ने जिंकत त्यांनी बरोबरी साधली.
तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने सुरुवातीपासूनच नियंत्रण राखले. मध्यंतरापर्यंत ११-५ अशी भक्कम आघाडी घेत त्रिशा-गायत्रीने दबाव कायम ठेवला आणि निर्णायक गेम २१-१३ असा खिशात घालत ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या तीनही लढतींमध्ये भारतीय जोडीला या चिनी प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे हा विजय अधिक खास ठरला.
त्रिशा आणि गायत्रीच्या या विजयामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भारताच्या एकूण पदकांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे (१ सुवर्ण, ४ रौप्य आणि ११ कांस्य). भारताने २०११ पासून सलग ११ आवृत्त्यांमध्ये किमान एक पदक जिंकण्याचा अनोखा विक्रम कायम राखला आहे.
सात्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात
दुसरीकडे, भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या लियांग वेईकेंग आणि वांग चांग या जोडीने अवघ्या ३६ मिनिटांत भारतीय जोडीचा २१-१८, २१-९ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये १८-१६ अशी आघाडी असतानाही सलग ५ गुण गमावल्याने सात्विक-चिरागला पहिला गेम गमवावा लागला आणि दुसऱ्या गेममध्ये चिनी जोडीने पूर्णपणे वर्चस्व गाजवले.