गोवा सायकलिंग असोसिएशनची सूत्रे नव्या समितीकडे

गोव्यातील सायकलिंग क्षेत्राला नवा वेग : २०२६ ते २०३० कालावधीसाठी निवड

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
12th August, 11:58 pm
गोवा सायकलिंग असोसिएशनची सूत्रे नव्या समितीकडे

पणजी : गोव्यातील सायकलिंग क्रीडा प्रकारात आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू आणि खेळाडूंचे प्राबल्य असलेल्या नव्या कार्यकारिणीकडे गोवा सायकलिंग असोसिएशनची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. २०२६ ते २०३० या आगामी चार वर्षांच्या कालावधीसाठी असोसिएशनच्या नव्या समितीची बिनविरोध निवड झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रीय सायकलपटू डॉ. ब्लान्शे थेमुडो यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी ॲड. एस. वाय. थळी यांनी जाहीर केलेल्या अंतिम यादीनुसार, प्रमुख पदांसाठी एकच वैध अर्ज आल्याने मतदानाची गरज भासली नाही आणि संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. ब्लान्शे थेमुडो यांनी ही निवड गोव्याच्या क्रीडा जगतात ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. गोव्यात एखादी क्रीडा संघटना पूर्णपणे खेळाडूंकडूनच चालवली जाण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. आमच्या कार्यकारिणीतील बहुतांश सदस्य हे स्वतः सायकलपटू आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या गरजा आणि अडचणींची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. संपूर्ण पारदर्शकता ठेवून गोव्यातील नवोदित सायकलपटूंना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आमची समिती कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोवा सायकलिंग असोसिएशनची नवी कार्यकारिणी
अध्यक्ष: डॉ. ब्लान्शे थेमुडो, उपाध्यक्ष: विद्यानंद खांडेपारकर, ब्लेझ कॉस्टाबीर, ब्रायन सोअर्स, सचिव: नीरज गुप्ता, खजिनदार: बीना कुमारी, सहसचिव: विनायक गावणकर, ॲडेलिना मास्करेन्हस, कार्यकारी समिती सदस्य: पुष्पा चॅटर्जी, स्टॅन्ली रॉड्रिग्ज, व्हर्जिनिया ज्युलिएटा रोझा, अजय डोंगरे
न्यायालयाच्या निर्णयानंतर वादावर पडदा
गेल्या काही काळापासून गोवा सायकलिंग असोसिएशनमध्ये सदस्यत्व आणि मतदानाच्या अधिकारावरून तीव्र वाद सुरू होता. सुमारे ६६ सायकलपटूंच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने या ६६ सायकलपटूंचे सदस्यत्व कायम ठेवल्याने आणि त्यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिल्याने मतदार यादीतील गोंधळ दूर झाला आणि निवडणुकीचा मार्ग सुकर झाला. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 'सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया'तर्फे ॲड. एम. के. पाशा आणि 'गोवा ऑलिम्पिक असोसिएशन'तर्फे जयेश नाईक यांनी अधिकृत निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.