जंगलात हरवलेल्या ट्रेकरचा पोलीस, ग्रामस्थांमुळे वाचला जीव

बडसरे गावडोंगरी येथील घटना : मोबाईल नेटवर्क मिळाल्यामुळे साधला संपर्क

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
12th August, 11:31 pm
जंगलात हरवलेल्या ट्रेकरचा पोलीस, ग्रामस्थांमुळे वाचला जीव

काणकोण : मूळ गावडोंगरी येथील व सध्या दवर्ली मडगाव येथे राहणारा रोहित कुडाळकर हा युवक बुधवारी गावडोंगरी उचले बडसरे येथील डोंगरावर ट्रॅकिंगसाठी गेला असता पाय घसरून दरीत पडला. त्याने पोलीस कंट्रोल रुमला फोन केला व आपण असलेल्या ठिकाणाचे मोबाईल लोकेशन पोलिसांना पाठवल्याने त्याचा शोध घेणे सोपे झाले. पोलीस कॉन्स्टेबल व गावकऱ्यांना तो सापडल्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ पडला. पोलिसांना तो मिळण्यापूर्वी मोबाईल फोन बंद पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

रोहित कुडाळकर हा बुधवारी सकाळी मोटरसायकलने मडगावहून गावडोंगरी बडसरे येथे आला होता. बडसरे येथील मठाजवळ आपली दुचाकी ठेवून डोंगर माथ्यावर गेला होता. चोहीबाजूंनी जंगल व चिखल झालेल्या मातीवरून तो खाली कोसळला. रोहित याने प्रसंगावधान राखून पोलीस कंट्रोल रुमला व आपण पडलेल्या जागेचे लोकेशन मोबाईलद्वारे पाठवल्याने पोलीस यशवंत देसाई व गावकऱ्यांना त्याचा शोध घेणे सोपे झाले. यापूर्वीही पोलीस कॉन्स्टेबल यशवंत देसाई यांनी चावडी येथील सोन्याच्या दुकानात चोरी केलेल्या चोरांचा पाठलाग केला होता. मात्र त्यावेळी चोर मिळू शकले नव्हते.

शोधमोहिमेत अग्निशामक दल, वन कर्मचारीही सहभागी झाले होते. दरम्यान, सदर युवक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाचा तिरंगा लावण्यास डोंगरमाथ्यावर गेल्याची बतावणी करीत होता. मात्र, त्याने लावलेला तिरंगा कुठे दिसला नाही वा त्याच्या बॅगमध्येही तिरंगा नव्हता, असे शोधमोहिमेत गेलेल्या पोलीस व गावकऱ्यांनी सांगितले.

सुरक्षितपणे सुटका झाल्यानंतर रोहित कुडाळकर याने तत्काळ प्रतिसाद देऊन प्राण वाचवल्याबद्दल गोवा पोलीस, वन खाते आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

ग्रामस्थांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

हा युवक डोंगरमाथ्यावर जात असल्याचे गावच्या काही लोकांनी पाहिले होते. या डोंगरमाथ्यावर जंगली जनावरे आहेत तेथे जाऊ नको, असा इशारा दिला असतानाही हा युवक डोंगरावर गेला होता, असेही गावकऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा